
२५ कोटींचा निधी डीपीसीकडे पडून
विरार : नालासोपारा मौजे आचोळे, येथे प्रस्तावित असलेल्या ४०० खाटांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा सातबारा अद्याप तयार झालेला नाही. महसूल विभागाकडून या सातबाऱ्यात एक बदल झाला असला तरी, दुसरा बदल करून महापालिकेच्या नावे हा सातबारा झाला नसल्याने, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
नालासोपारा परिसरातील आचोळे येथील सर्वे क्रमांक ६ मध्ये ४०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या कामासाठी २५० कोटी रुपये निधी मंजूर असून त्यापैकी २५ कोटी रुपये पालघर जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात आले आहेत. मात्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याने रुग्णालयाचे काम देखील रखडले आहे. रुग्णालयासाठी मंजूर असलेली आचोळे येथील ०.९०३८ हेक्टर आर एवढी जागा अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश वसई यांचे न्यायालय व न्यायिक अधिकारी,कर्मचारी यांचे निवासस्थानासाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी रुग्णालयाचे काम होणे शक्य नव्हते. दरम्यान, उपरोक्त कामासाठी वसई येथील सर्वे क्रमांक २७ मधील १० हजार ६८३.४० चौरस मीटर जागा देण्यात आली आहे. त्यामुळे आचोळे येथील जागा नको असल्याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश ठाणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे. परिणामी आचोळे या ठिकाणी रुग्णालयाचे काम होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह त्याच जागेवर करण्याचे प्रयोजन असल्याची बाब पुढे आली. सदर जागेवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे यासाठी नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने शुद्धिपत्रक काढून मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलसाठी आचोळे सर्वे क्रमांक ६ ची जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया करणे बाबत सूचना दिली . तरीही या प्रक्रियेला गती येत नसल्याने या संदर्भात आमदार राजन नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली व जागेचा विषय निकाली काढण्याबाबत विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना जागेचा विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी बैठक घेत, मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यासाठी लागणारी जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी संबंधित जागेचा सातबारा महाराष्ट् शासनाच्या नावे करण्याची प्रक्रिया वसई तहसीलदारांकडून करून घेतली आणि ही माहिती शासनाला सादर केली. आता शासनाकडून महाराष्ट्र शासन अशी नोंद असलेल्या सातबाऱ्यात वसई विरार शहर महानगरपालिका अशी नोंद घेण्याचे आदेश अपेक्षित आहेत. २५ कोटीचा निधी उपलब्ध असला तरी, महापालिकेच्या नावे सातबाराच नसल्याने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम रखडले आहे.
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक जागेची नोंद महाराष्ट्र शासनाच्या नावाने नुकतेच घेण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या नावाने सातबारा करण्यासाठी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी पालघर.