मुंबई : केंद्र सरकारने जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीची जातीची माहिती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या सर्व परिस्थितीची माहिती असताना मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनासाठी येण्याची तयारी करत आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगेंनी तसे सूतोवाच केले. जरांगेंनी मुंबईत धडक मारण्याचा इशारा देताच लक्ष्मण हाके आणि त्यांच्या ओबीसी समर्थकांच्या हालचालींनाही वेग आला आहे. सरकारने कोणाच्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावाखाली येऊन पक्षपात करणारा निर्णय घेऊ नये यासाठी ओबीसींनी मुंबईत धडक मारण्याचे नियोजन सुरू केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून २७ ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई’ आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून २९ ऑगस्ट रोजी तेथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची औपचारिक घोषणा केली आहे.
जरांगेंनी मुंबईत धडक मारण्याची घोषणा करताच लक्ष्मण हाके आणि त्यांचे ओबीसी समर्थक सक्रीय झाले आहे. ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी पुण्यात समाजाची बैठक बोलावली आहे. ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी मुंबईत धडक मारणार असल्याचे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या ओबीसी समर्थकांनी सांगितले. पुण्यात ४ जुलै रोजी बैठक घेऊन पुढील नियोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजाची १५ जुलै रोजी मोठी बैठक होईल असेही त्यांनी सांगितले.