नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड नेतृत्वशैलीचे वर्णन करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रेमाने वापरत आहेत. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार धोनीची क्रीडा प्रशिक्षण, प्रशिक्षण सेवा आणि प्रशिक्षण केंद्रांसाठी 'कॅप्टन कूल' हे नाव वापरण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ट्रेडमार्क रजिस्ट्री पोर्टलनुसार अर्ज आता स्वीकारण्यात आला आहे. त्याची जाहिरात करण्यात आली आहे. हा ट्रेडमार्क १६ जून २०२५ रोजी अधिकृत ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. दरम्यान, नजीकच्या काळात अनेक क्रीडापटूंनी त्यांच्या टोपणनावांचा वापर केला आहे. यामध्ये मायकेल
जॉर्डनने जंपमन लोगोचा वापर करण्यापासून ते क्रिस्टियानो रोनाल्डोने 'CR7' ला व्यावसायिक साम्राज्यात रूपांतरित करण्यापर्यंतची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. गेल्या काही वर्षांत धोनीने आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर 'कॅप्टन कूल' म्हणून का ओळखले जाऊ लागले हे वारंवार दाखवून दिले आहे. त्याने २००७ मध्ये भारतीय संघाला पहिल्या-वहिल्या टी-२० विश्वचषकाचे अजिंक्यपद मिळवून दिले होते. त्यानंतर २०११ मध्ये घरच्या मैदानावर ऐतिहासिक एकदिवसीय विश्वचषक विजय आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. क्रिकेट इतिहासात तो तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.






