Saturday, August 2, 2025

खोट्यांची दुनिया विस्तारत आहे

खोट्यांची दुनिया विस्तारत आहे

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


काय चाललंय... काय चाललंय जगात? खरोखरी, खोट्यांची दुनिया विस्तारत चालली आहे. वाङ्मयात पूर्वी विसंगती, विरोधाभास यामुळे विनोद निर्मिती व्हायची. पण आता विनोद जाऊ द्या, सत्य-असत्य कळणेच कठीण झाले आहे.


परवा कार्यक्रमानंतर एक बाई माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, “माझे नाव शुभदा. मी तुमची फेसबुक फ्रेंड आहे.” तसा मी तिचा चेहरा अजिबातच ओळखला नाही, पण मला तिला दुखवायचे नव्हते. तिनेही खूप प्रेमाने माझ्याबरोबर सेल्फी काढून घेतला त्यानंतर मी घरी आले. सवयीप्रमाणे फेसबुक उघडले तर शुभदाने मला टॅग केलेले होते आणि आम्हा दोघांचा फोटो फेसबुकवर टाकलेला होता. श्वास घेण्याआधी आजकाल काढलेला फोटो फेसबुकवर येतोसुद्धा, याचा परत एकदा प्रत्यय आला. आपला चेहरा आपल्याला कुठेही पाहायला आवडतोच म्हणा...! आणि चक्क फेसबुकवरील ती मला ओळखता आली. हा तर तिचा नेहमीचा पाहिलेला चेहरा होता मग कार्यक्रमानंतर मला ती का ओळखू आली नाही, असा विचार मनात आला आणि ‘आपलं वय झालंय!’ असे म्हणून मी सोडून दिले.


प्रचंड भूक लागली होती म्हणून जेवून घेतले आणि जरासे लोळत परत एकदा व्हाॅट्सअ‍ॅप उघडला, तर एका बिनओळखीच्या नंबरवरून शुभदा आणि माझा फोटो मला व्हाॅट्सअ‍ॅपवर पाठवलेला दिसला. होय, कार्यक्रमानंतर शुभदाने माझा मोबाईल नंबर घेतल्याचे मला त्या क्षणी आठवले. मी आपला विसरभोळा स्वभाव लक्षात घेऊन सर्वात आधी तिचा नंबर तिच्या संपूर्ण नावानिशी आणि एफबी फ्रेंड असेही पुढे टाकून जतन केला. जतन केला म्हणजे सेव्ह केला. नाही म्हणजे काही शब्द आजकाल विस्मृतीत जात चालले आहेत माझ्याही आणि तुमच्याही म्हणून अधूनमधून अशी माहिती द्यावी लागते!


असो... मग मी तो व्हाॅट्सअ‍ॅपवरचा फोटो पाहिला आणि लक्षात आले की, परत हा चेहरा बिनओळखीचा का वाटतोय? मी शुभदाने फेसबुकवर टाकलेला आमचा फोटो आणि मला व्हाॅट्सअ‍ॅपवर आलेला फोटो बाजूबाजूला ठेवून पाहिले आणि मग गोम लक्षात आली. तिने तिच्या चेहऱ्याचे रूपांतरण केल्यासारखे वाटले. म्हणजे ज्या आकाराचे नाक होते त्यापेक्षा नाक आकाराने छोटे केले होते अगदी कुंदकळी वगैरे, छोटे डोळे खूप मोठे केले होते, गाल बऱ्यापैकी फुगीर केले होते, जाडेभरडे ओठ नाजूक आणि लालबुंद केले होते. तिचा चेहरा इतका स्वच्छ चकचकीत होता एखाद्या नवजात बालकासारखा! चेहऱ्यावरचे सगळे पिंपल्स, डाग, डोळ्यांखालची काळी वर्तुळं फेसबुकवरच्या फोटोवरून गायब झाली होती! आणि लक्षात आले की व्हाॅट्सअ‍ॅपवर आलेला फोटो आणि फेसबुकवर असलेला हा फोटो यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. मी शुभदाला गेले पाच वर्षे फेसबुकवर बघत आलेले आहे. त्यामुळे माझ्याच्याने प्रत्यक्ष भेटीत गल्लत झाली.


आता मी विचार करत आहे की काय चाललं आहे? फेसबुकवर पोस्ट पाहताना अधेमधे काही रील्स येतात आणि आपण स्वाभाविकपणे ते पाहतो. अलीकडे काही वृद्ध अतिउंचावरच्या डोंगरावर त्यांच्या स्वतःच्या आकारापेक्षा कितीतरी मोठे असे काही अन्नपदार्थ शिजवत असतात, घराबाजूच्या घसरगुंडीवरून घसरत असतात. डुक्कर, कोंबड्या, ससे आजूबाजूला फिरत असतात. ते कधी शेती करत असतात, तर कधी बोटिंगमधून मासेमारी करत असतात. म्हणजे कोणत्याही क्षणी ते खोल खाईत पडू शकतात असे असूनही ते काडीचीही काळजी न घेता मस्तीत आनंदात बागडत असतात, नाचत असतात, खातपीत असतात, खेळत असतात, सायकल चालवत असतात इ.


एका रीलमध्ये तर एक सामान्य मुलगा एका भूतनीबरोबर (मेल्यानंतर भूत झालेल्या मुलीबरोबर) गप्पा मारतो, तिला फिरायला घेऊन जातो वगैरे. ही भूतनी त्याला गरज असताना पैसे देते, तो जखमी झाल्यावर क्षणात त्याच्या जखमा मिटवून त्याला पूर्ववत करते इ. अशा रील्स जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्यालाही कळत नाही काय खरे आहे आणि काय खोटे आहे. फोटोशॉपने आपला चेहरा जसा संपूर्णतः बदलता येतो त्याचा कायापालट करता येतो, त्याचप्रमाणे एआयच्या मदतीने असे असंख्य रील्स बनवले जातात. जे पाहायला खूप छान वाटतात; परंतु वास्तवात असंभव! सातत्याने असे काही डोळ्यांसमोर येऊ लागले की, खरे आणि खोटे यातला फरक कळेनासा होतो. खोटेच खरे वाटू लागते.


मला त्या अतिउंच टेकडीवर, खाईत पडण्याची भीती न बाळगणाऱ्या, आनंदाने जगणाऱ्या त्या माणसांमध्ये जाऊन निसर्गाचा आस्वाद घ्यावासा वाटतो, तर कधी मलाही काहीच न बोलता, मनातले ओळखणाऱ्या आणि सर्वस्व पुरवणाऱ्या एखाद्या भुताचा शोध घ्यावासा वाटतो!


खऱ्या जगात, या वास्तववादी दुनियेत अलीकडे मन रमत नाही. कधी कधी केवळ काही क्षणांसाठी या खोट्यांच्या दुनियेत फेरफटका मारावासा वाटतो. खोट्यांची जी दुनिया विस्तारत आहे त्यातच आपणही सामावून जावं, असे वाटते!

Comments
Add Comment