Thursday, July 10, 2025

असाध्य ते साध्य करता सायास...

असाध्य ते साध्य करता सायास...

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


“असाध्य ते साध्य करता सायास” म्हणजे खूप कठीण वाटणारी गोष्ट देखील मेहनत, चिकाटी आणि प्रयत्नांनी साध्य होऊ शकते. आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या सुरुवातीला अशक्य वाटतात, पण जर आपण हार न मानता प्रयत्न करत राहिलो, तर त्या नक्कीच शक्य होतात.


एक छोटीशी गोष्ट समजून घेऊया -
एक छोटी मुंगी साखरेच्या डब्याकडे जाते. तिच्या मार्गात अनेक अडथळे असतात - एखादा दगड, खड्डा, वारा.
कधी ती घसरते, कधी परत फिरते, पण ती थांबत नाही. पुन्हा प्रयत्न करते. शेवटी ती साखरेपर्यंत पोहोचते. तिच्या चिकाटीमुळे अशक्य वाटणारे काम शक्य होते.


तसेच काही उदाहरणे आपण पाहूया -
थॉमस एडिसन यांनी विजेचा बल्ब तयार करण्यासाठी हजारो प्रयोग केले. सुरुवातीला सर्व अपयशी झाले, पण त्यांनी हार मानली नाही. शेवटी त्यांनी यश मिळवले.
आपल्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक महापुरुषांनी अपार मेहनत घेतली. त्यांनी असाध्य वाटणारे स्वातंत्र्य अखेर साध्य केले.


आपल्याला यातून काय शिकायला मिळते?
कोणतेही कार्य अशक्य नाही. प्रयत्न करणे आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे. अपयश आले तरी घाबरायचे नाही, त्यातून शिकायचे.


मनात विश्वास असेल तर मोठमोठी स्वप्ने सुद्धा पूर्ण करता येतात. एक उदाहरण आठवले- आपण चित्रपट पाहतो. नटाचे काम आवडते म्हणून २ वेळाही चित्रपट काहीजण बघतात; परंतु या यशापर्यंत पोहोचायला त्यांनाही अपार मेहनत करावी लागते. अपयशाच्या पायऱ्या चढून नंतरच यशाचे शिखर गाठता येते.


जुन्या काळातील सर्वांचा आवडता नट -शम्मी कपूर याचा हिट चित्रपट “तुमसा नहीं देखा’’ या चित्रपटाच्या अगोदर त्यांचे १७ चित्रपट आपटले; परंतु न हारता त्यांनी आपल्या चुका शोधून पुढील वेळी त्यात सुधारणा करत गेले आणि पुढचा चित्रपट “तुमसा नहीं देखा’’ हिट झाला.


महान टेनिसपटू फेडरर आणि नडाल यांनी तर खूप वेळा पहिले दोन डाव मागे पडल्यावर हार मानली नाही, प्रयत्नांची शर्थ करून पुढील तीन सेट जिंकून मॅच जिंकली आहे.
शेवटी एवढंच


सांगावसं वाटतं -
आपण छोटे असलो तरी आपले विचार, मेहनत आणि चिकाटी मोठी असली पाहिजे. काहीही अशक्य नाही - फक्त “सायास”, म्हणजेच प्रयत्न लागतो. मग तो अभ्यास असो


की, खेळ, चित्रकला की स्वप्नपूर्ती -
प्रयत्न करा, पुढे चला आणि असाध्य तेही साध्य करा!


आपण शाळेत अभ्यास करताना, नवी गोष्ट शिकताना किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घेताना जर अडचण आली, तर आपल्याला ती सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सुरुवातीला काहीच समजत नाही, चुका होतात, पण जेव्हा आपण हार न मानता पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो, तेव्हा एक दिवस यश आपल्याच पायाशी येतं.


थोडक्यात सांगायचं झालं, तर यश मिळवण्यासाठी जादू नसते, पण प्रयत्नांची शक्ती असते. म्हणूनच, चला आपण सगळे ठरवूया - कठीण गोष्टींपासून पळायचं नाही, तर प्रयत्न करायचे आणि एक दिवस असाध्य गोष्ट सुद्धा आपल्यासाठी साध्य होईल!


असाध्य ते साध्य करता सायास,
मेहनतीला नाही कधी फुकटवास।
पडूनही जे उभं राहतं,
तेच यशाचं फळ चाखतं।


मुंगीची चाल शिकावी आपली,
प्रयत्नांची साखर मिळते ती गोडस।
घेऊ स्वप्नं, ठेवू ध्यास,
यश मिळवू मोठा खास।


१) “प्रयत्न म्हणजेच यशाची गुरुकिल्ली!”


२) “जिथे इच्छाशक्ती, तिथे मार्ग सापडतो!”


३) “अडचणींचा सामना करा, यश आपल्याच पायाशी झुकतं!”


४) “स्वप्न तिच पूर्ण होतात, जे थांबून नव्हे, धावत मिळतात!”

Comments
Add Comment