स्नेहधारा : पूनम राणे
इयत्ता नववीचा वर्ग. वर्गात मराठीचा तास चालू होता. गोखले बाई, प्रीतम नावाचा पाठ शिकवत होत्या. सारेच विद्यार्थी एकाग्रतेने बाईंची शिकवण ऐकत होते. कारण पाठही
तसाच होता.
रोशन नावाचा विद्यार्थी मात्र अस्वस्थ दिसत होता. त्याच्या मनात काहीतरी चलबिचल चालू होती. गोखले बाईंच्या ते चटकन लक्षात आले. गोखले बाईंनी त्याला आवाज दिला; परंतु त्याचे बाईंच्या आवाजाकडे लक्षच नव्हतं. कोणत्यातरी विचारात तो गुंतून गेला होता. त्याने या शाळेत नुकताच नवीन प्रवेश घेतला होता. गोखले बाईंनी त्याच्याजवळ जाऊन प्रेमाने विचारलं, ‘‘अरे रोशन, कोणत्या विचारात आहेस?” आडेवेडे घेत तो म्हणाला बाई...बाई... काही नाही... अरे, बोल ना, रोशन बोलू लागला, हा पाठ शिकवत असताना मला माझ्या पूर्वीच्या शाळेतील सौरभची आठवण झाली. आठवीनंतर आपल्याला वर्गशिक्षक बदलणार म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या वर्गशिक्षिका कुलकर्णी बाई यांना भेटवस्तू देण्याचे ठरवलं.
वर्गातील मॉनिटरने तशी सर्वांना सूचना दिली. सर्वांनी उद्या घरून पन्नास रुपये घेऊन यायचे. सौरभ मात्र विचारात पडला. सौरभ अत्यंत गरीब विद्यार्थी होता; परंतु अत्यंत हुशार. सर्व गुणसंपन्न. त्याची आई कचरा वेचण्याचे काम करत होती.
सौरभ पन्नास रुपये भरू शकत नव्हता. आम्ही त्याची वर्गणी भरायला तयार होतो; परंतु सौरभला ते मान्य नव्हतं. सर्व विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून बाईंना छानशी साडी भेट दिली. तेवढ्यात सौरभ आपल्या जागेवरून उठला. त्यांने वहीच्या कागदाच्या पाकिटातून एक भेटवस्तू बाईंना दिली. बाईंनी ती भेट आनंदाने स्वीकारली. त्यानंतर सौरभने आपले मनोगत व्यक्त केले, तो म्हणाला, ‘‘मॉनिटरने पन्नास रुपये आणायचे सांगितल्यानंतर मला काय करावे हेच सुचत नव्हते. माझे मित्र वर्गणी भरायला तयार होते; परंतु मला ते मान्य नव्हते. त्या दिवशी मी खिन्न मनाने घरी गेलो. आई कचरा वेचून आली होती. ती म्हणाली, ‘‘अरे, असा चेहरा का पडलाय तुझा!” तुला काय झालंय.” मी आईशी बाईंना भेट काय द्यावी याविषयी बोललो. आई म्हणाली काळजी करू नकोस. अरे, आज कचरा वेचताना एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून टाकलेले कानातील काही, नको असलेले काही खोटे दागिने आणि ही बघ छान पर्स मिळाली आहे. यावर मोती आणि हिरे लावून सजवलेली आहे. बहुतेक श्रीमंत घरातील वापरून झालेली असावेत. मात्र आमच्यासारख्या गरिबांना नवीनच वाटणारे. अशा त्या प्लास्टिकच्या पिशवीतील वस्तू आई संध्याकाळी घरी घेऊन आली.
त्यातील छोटीशीच पर्स मलाही आवडली. ही पर्स आपण बाईंना देऊ. असा विचार करून मी ही पर्स बाईंना दिली. सर्व विद्यार्थी कान देऊन त्याचे बोलणे ऐकत होते.
बाईंना त्याचे खूप कौतुक वाटले. त्यांनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाल्या. देण्याची सवय मनात ठेवली तर येणं आपोआप सुरू होतं. तुझी ही छोटीशी भेट मला खूप आवडली. ती सतत माझ्याजवळ राहील. सौरभला खूप आनंद झाला.
रोशन म्हणाला, बाई, हा पाठ शिकवताना माझ्या डोळ्यांसमोर सौरभ दिसत होता. मी त्या आठवणीत हरवून गेलो होतो. सौरभ नावाप्रमाणे सौरभ होता.
बाईंनी रोशनला जवळ घेतलं आणि म्हणाल्या, रमेश तुझ्यासारख्या संवेदनशील आणि सौरभसारख्या स्वाभिमानी मुलांची गरज आज देशाला आहे. इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या आणि प्रीतम नावाचा पाठ विद्यार्थ्यांच्या मनोमनी ठसला.