
संवाद : गुरुनाथ तेंडुलकर
वास्तविक हा प्रकार गेली वर्षानुवर्ष चाललाय म्हणे... मला मात्र हा प्रकार अगदी अलीकडेच समजला. वाराणसीच्या जगन्नाथ मंदिरात जगन्नाथावर दररोज महाभिषेक करतात. सततच्या अभिषेकामुळे देवाला सर्दी पडशाचा त्रास होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देवाला सर्दी पडसं झालं की देवही हैराण होणारच की, त्यालाही आराम हवाच. म्हणून देवाला आठ-दहा दिवस आराम दिला जातो. देवदर्शन बंद ठेवलं जातं. एवढंच नव्हे तर या दहा दिवसांच्या काळात देवावर औषधोपचारही केले जातात. लवंग, वेलची, जायफळ, तुळस, खडीसाखर, मध, चंदन, गुलाबपाणी आणि इतरही काही औषधी वनस्पती वापरून पुजारी मंडळी देवावर उपचार करतात. देवाला लेप वगैरे लावतात आणि देवाच्या अंगावरचा हा लेप नंतर भक्तांना प्रसाद म्हणून वाटण्यात येतो. भक्तही अगदी चवीने हा प्रसाद चाखतात आणि
ताजेतवाने होतात. पुजाऱ्यांनी केलेल्या औषधोपचारामुळे आजारी पडलेला देव आठ-दहा दिवसांत खडखडीत बरा होतो आणि पुन्हा वर्षभर भक्तांना दर्शन द्यायला, त्यांची सगळी कामं करायला सज्ज होतो.
मी हे जे काही सांगितलंय यात एक पैशाचीही अतिशयोक्ती नाहीये. तुम्ही स्वतः वाराणसीच्या जगन्नाथ मंदिरात जाऊन खात्री करून घेऊ शकता. माणसांची श्रद्धा कोणत्या थराला जाऊन कोणतं रूप घेऊ शकते याचं हे एक उदाहरण. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला आढळतात.
वेगवेगळ्या ठिकाणी देवाला देवाला कोंबडी, बकरा मारून मटणाचा नैवेद्य दाखविला जातो तर काही ठिकाणी काही दैवतांना दारू देखील दिली जाते. शंकर महाराज नावाच्या एका संताच्या मठात तर म्हणे भाविक मंडळी नैवेद्य म्हणून चक्क सिगारेटी ठेवतात. तर आणखी कुठल्या तरी महाराजाला म्हणे तंबाखूची चिलीम अर्पण करतात. देवदासी या प्रकारात देवाची सेवा करण्याच्या नावाखाली मुलींना वाऱ्यावर सोडलं जातं. त्यांचं सारं आयुष्य देवाच्या नावाखाली उद्ध्वस्त केलं जातं. अर्थात हे झाले टोकाचे प्रकार. पण आपण सर्वसामान्य माणसं देखील संकष्टीला घरी मोदक करून गणपतीला नैवेद्य दाखवतोच की संकष्टी चतुर्थी, अंगारकीच्या निमित्ताने उपवास केला जातो. रोजच्या जेवणात थोडा बदल होतो. थोडं गोडधोड केलं जातं. पूजेच्या निमित्ताने घरात धुपाचा गंध दरवळतो, वातावरण सुगंधीत होतं. आपलं मन ताजंतवानं होतं.
कधीतरी वर्षातून आपल्या घरी एखाद्या इष्ट देवतेची पूजा किंवा विष्णुसहस्त्रनाम पठणाचा कार्यक्रम केला जातो. त्यानिमित्तानं चार माणसं एकत्र येतात. हे इथपर्यंत ठीक आहे. देवाचं अस्तित्व मानण्याला कुणाचीच हरकत नसावी. कारण देव ही संकल्पना फार प्राचीन आहे. हजारो, लाखो वर्षांपासून ही परंपरा चालत आलीये.
अगदी आदिमानवाच्या काळापासून ते आजच्या काॅम्प्युटर युगापर्यंत ‘देव’ नावाच्या शक्तीचं अस्तित्व सगळ्यांनीच मान्य केलंय. त्याबद्दल कुणीच आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण... देव या संकल्पनेत ज्यावेळी माणसाचा स्वार्थ शिरतो त्यावेळी मात्र सगळंच नासून जातं. पातेलंभर दुधामध्ये चिमुटभर मीठ पडावं तसं होतं. मांगल्याचं रूपांतर अमंगलात होतं.
‘देव आहे’, ‘तो शक्ती देतो’, ‘त्यानं दिलेली शक्ती संकटात भक्तांना तारते.’ इथपर्यंत श्रद्धा असणं ठीक आहे. पण तो देव प्रसन्न व्हावा म्हणून त्याला नवस केले जातात. ते नवस करण्यासाठी ‘पुजारी’ नावाचा कुणी मध्यस्थ, दलाल लागतो. या मध्यस्थांमार्फत भक्तांनी देवाबरोबर बोलायचं. तो पुजारी म्हणजे देव आणि भक्त यांच्यातील जणू दुभाषाच असतो.
पुढे पुढे तर हा पुजारी देवापेक्षाही मोठा होतो. ‘देवाला हे हवं.’ आणि ‘देवाला ते हवं.’ असं सांगून गोरगरीब श्रद्धाळू भक्तांना हे पुजारी नागवतात. अनेकदा हे पुजारी केवळ देवळातच नसतात. भगत, गुरव, मांत्रिक-तांत्रिक अनेक रूपांत हे ‘देवाचे दलाल’ आपल्यासमोर येतात. भक्तांची श्रद्धा हेच यांचं भांडवल असतं. वेळप्रसंगी भोळ्या भाबड्या भक्तांना धाकही घातला जातो. पूजा अर्चा, होम हवन, मंत्रजागरपासून ते नारायण-नागबळीपर्यंत... क्वचित तर नरबळी सुद्धा...!
अलीकडे पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरात या पुजारी मांत्रिक तांत्रिकांच्या बरोबरीने आणखी एक वर्ग उदयाला आलाय. तो म्हणजे बुवा, बापू, महाराज, स्वामी लोकांचा...
मंदिरातला पुजारी काय किंवा गावातला भगत-मांत्रिक हा केवळ भक्त आणि भगवंत यांच्यातला दुवा असतो. इथं तर हा बुवा-बापू म्हणजे साक्षात भगवंतच असतो. पुजारी भक्तांना देवाची पूजा करायला लावून पैसे उकळतो इथं तर हा बाबा भक्तांकडून स्वतःचीच पूजा करून घेतो. मांत्रिक तांत्रिक काय किंवा पुजारी गुरव काय कधीही स्वतः देवापेक्षा मोठे असल्याचा दावा करीत नाहीत. स्वतःचे फोटो विकत नाहीत.
सिद्धिविनायकाच्या देवळाजवळ फोटो विकले जातात ते गणपतीचे. सिद्धिविनायकाचे. पण इथं तर या ‘बुवा-बापू’च्या सत्संगात त्या त्या बुवा-बापूचे फोटो विकले जातात. जिवंत माणसाचे फोटो लोक घरी घेऊन देव्हाऱ्यात लावतात. त्याची पूजा करतात. त्या बुवा-बापूची भक्ती करण्यात हे भक्त तल्लीन होऊन जातात. त्यामुळे आंधळी श्रद्धा कोणत्या थराला जाऊ शकते आणि कोणत्या प्रकारचं रूप घेऊ शकते याला सीमाच नसते. एकदा बुद्धी अंध झाली की विचार करण्याची शक्तीच खुंटते. आपल्या आजूबाजूला पाहिलंत तर आपल्याही ओळखी-पाळखीत, आप्त-मित्र-परिवारात अशा प्रकारची कोणत्या ना कोणत्या तरी बुवा-बापूच्या भजनी लागलेली आणि त्या बुवा-बापूला साक्षात देवाचा अवतार समजणारी माणसं आढळतील.
संत कबिराची एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो... संत कबीर एकदा एका नदीच्या काठाने चालले असता त्यांनी एके ठिकाणी दहा-बारा माणसं गोळा झालेली पाहिली. ते जवळ गेले.
तिथं एक पुजारी काही तरी मंत्र पुटपुटत होता आणि लोक नदीच्या पात्रात भाताचे गोळे सोडत होते. कबीर जवळ गेले आणि त्यांनी हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांना उत्तर मिळालं की, शेटजींचा मुलगा शिक्षणासाठी परदेशात गेला होता. तिथं त्याला कोणत्याही अडचणी येऊ नयेत. तिथं त्याला अन्नपाणी व्यवस्थित मिळावं म्हणून इथं ब्राह्मणांना सुवर्णमुद्रा दान करून हे भाताचे गोळे नदीच्या पात्रात सोडले जाताहेत.
कबीर हसले आणि त्यांनी नदीचं पाणी ओंजळीत घेऊन जोरजोरात ओरडत किनाऱ्यावर टाकायला सुरुवात केली. त्या शेटजींनी विचारलं, ‘कबिरजी, हे काय चाललंय ?’
‘मी माझ्या शेताला पाणी घालतोय...’‘पण तुमचं शेत आहे तरी कुठे?’ शेटजींनी प्रश्न केला. ‘शेत दोन मैलांवर आहे.’ कबीर उत्तरले.मग इथं किनाऱ्यावर पाणी ओतून दोन मैलांवरच्या शेताला पाणी थोडंच मिळणार आहे?’ शेटजींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि नाराजी उमटली. ‘कां नाही? जर तुम्ही इथं मंत्र म्हणून नदीच्या पाण्यात टाकलेलं अन्न हजारो कोस दूर असलेल्या तुमच्या मुलापर्यंत पोहोचतं तर मग माझं शेत तर फक्त दोनच मैल लांब आहे.’ कबिरानं मिश्कीलपणे उत्तर दिलं.
कोणत्याही जिवंत बाबा-बापूच्या फोटोसमोर जेवणाचं ताट ठेवून नैवेद्य दाखविणाऱ्या भाबड्या भक्तांना जर तुम्ही हे सांगायला गेलात तर त्यांना ते पटेल? मुळीच पटणार नाही. उलट ते भक्त तुम्हालाच चार गोष्टी सुनावतील.
आमचे ‘स्वामीजी’ म्हणजे सामान्य माणूस नाहीच मुळी. ते साक्षात भगवंताचे अवतार आहेत. ते त्रिकाळज्ञ आहेत. त्यांना आपल्या मनातील सगळं कळतं. वगैरे वगैरे वगैरे... तुम्ही आणखी वाद घालायला गेलात तर तो भक्त तुम्हाला त्याला स्वतःला आलेल्या आणि इतरांना आलेल्या अनुभवाच्या चार गोष्टी सुनावेल.
बुद्धीने अंध झालेल्या अशा माणसांना सूर्योदय दाखविणं हा आपला मूर्खपणा ठरतो. तो करूच नये पण त्याचबरोबर आपण स्वतः वागतांना मात्र असे आंधळेपणाने तर वागत नाही ना याची वेळोवेळी जाणीव ठेवणं मात्र फार आवश्यक असतं. आपण अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकून असला काही मूर्खपणा करीत नाही ना, याचा शोध प्रत्येकाचा प्रत्येकानं घ्यायला हवा.
जगात देव आहे की नाही या वादात न पडता देव ही निसर्गातली एक महान शक्ती आहे याची जाणीव ठेवून तिच्यासमोर नतमस्तक जरूर व्हावं. त्या शक्तीजवळ बुद्धी मागावी. मन एकाग्र होऊन हाती घेतलेल्या कार्यात यश दे अशी विनंती करावी. कार्य निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना करावी. पण त्याचबरोबर आपलं काम आपल्यालाच करायला हवं याची मनोमन जाणीव ठेवावी. देवाकडून फक्त प्रेरणा घ्यायची. उर्वरित कार्य स्वतःचं स्वतःच करायचं...
देव ही एक शक्ती आहे, व्यक्ती नाही याची सतत जाणीव ठेवायची आणि म्हणूनच देवाला सर्दी पडसं झालं म्हणून औषधोपचार करून त्याला आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या पातळीवर आणू नये... आणि त्याचबरोबर... बाबा बापू - स्वामी - महाराज म्हणून वावरणाऱ्या एखाद्या जिवंत माणसाला ‘अनंत कोटी ब्रम्हांडाचा नायक असं म्हणून देवाच्या पातळीवर नेऊ नये...! खरंय ना?