भीती पावसाची...

कथा : रमेश तांबे


आठवडाभर दमदार पाऊस पडत होता. ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत होत्या. धरतीने हिरवी शाल पांघरली होती. उन्हाळ्याच्या दिवसात कावलेली जमीन पावसाचे पाणी पिऊन तृप्त झाली होती. झाडेझुडपे पावसात मनसोक्त अंघोळ करत होती. प्राणी-पक्षीदेखील पावसाचा छान अनुभव घेत होते. अशावेळी मीना मात्र घराच्या खिडकीत बसून पाऊस नुसताच बघत होती. तिने अनेक वेळा आईला सांगितले, “अगं आई जाऊ दे ना मला पावसात! माझ्याकडे छत्री आहे, रेनकोट आहे.” तरीही आई मीनाला पावसात जाण्याची परवानगी देत नव्हती. शाळा सुरू होऊन चार दिवस उलटले होते. तरी पण मीना मात्र घरीच; कारण पाऊस पडतोय!


आता मात्र मीनाचा संयम सुटत चालला होता. आजूबाजूच्या तिच्या मैत्रिणी रंगीबेरंगी रेनकोट घालून शाळेत निघायच्या. खिडकीत बसलेल्या मीनाकडे बघत टाटा करायच्या. रस्त्यावरच्या पाण्यात खेळायच्या. मीनाला वाटायचे या मुली कशा जातात शाळेत. पावसातसुद्धा जातात, पाण्यात भिजतात, मजा करतात. मला ते का करता येत नाही! आईचं काही ऐकायचं नाही. मी जाणार पावसात. भिजले तरी चालेल. मी शाळेतसुद्धा जाणार. मीना स्वतःशीच बोलत होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. आज रविवार असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. सगळी मुले अंगणात जमा झालेल्या पाण्यात हुंंदडत होती. खेळत होती. मीनाला आता घरात बसवेना. ती आईचं लक्ष नाही असे बघून घरासमोरच्या अंगणात पळाली. पाऊस रिमझिम पडत होता. पावसाचे पाणी अंगावर घेत मीना मनसोक्त भिजू लागली. “येरे येरे पावसा तुला देते पैसा” हे गाणं गाऊ लागली. आता तिच्या मैत्रिणीदेखील तिच्या आनंदात सामील झाल्या.


बराच वेळ झाला तरी मीनाचा आवाज आला नाही, म्हणून आईने मीनाला हाक मारली, पण मीना तर बाहेर पावसात खेळत होती. मीना उत्तर देत नाही हे बघून आई लगबगीने बाहेरच्या खोलीत आली, तर तिथेही मीना नाही. आईने खिडकीतून बघितले तर मीना आपल्या मैत्रिणींसोबत पावसात खेळत होती. हे बघून आईचा पारा चढला. आईने अंगात रेनकोट घातला, शिवाय हातात छत्रीदेखील घेतली आणि तणतणतच अंगणात गेली. मीनाची आई रागात येते आहे हे पाहून बाकीच्या मुली तिथून पसार झाल्या. मीना मात्र आपली पाण्यात उड्या मारतच होती, पाऊस अंगावर घेत गोलगोल फिरत होती. आई जवळ येताच मीनाच्या अंगावर ओरडली, “अगं ये मीना तुला सांगितलं होतं ना पावसात जायचं नाही म्हणून? किती वेळा सांगू तुला?” एक जोराचा धपाटा तिच्या पाठीत लगावून आई मीनाला घरात घेऊन गेली.


घरात जाताच आई मीनावर पुन्हा ओरडली, “तुला सांगितलं होतं ना पावसात नाही जायचं! मग का गेलीस?” आईचं बोलणं थांबत नव्हतं. मीनाला कळेना आई एवढी का चिडली अन् आईने अंगणात येताना रेनकोट तर घातलाच वर छत्रीदेखील घेतली असे का! आईचं असं विचित्र वागणं मीनाला कळत नव्हतं. तितक्यात बोलता बोलता आईला चक्कर आली. अंगावरचा रेनकोट न काढताच जमिनीवर आडवी झाली. आईला काय झालं हे बघून मीना खूप घाबरली, पण तिने लगेच बाबांना फोन केला. बाबांनी पाच मिनिटांतच आईला दवाखान्यात दाखल केलं.


चार पाच तासांनी आईला बरे वाटले. डोळे उघडताच आईने बाबांना विचारले, “आपली मीना बरी आहे ना! ती पावसात बाहेर गेली होती. तिला काही झाले नाही ना!” आईचं बोलणं ऐकून मीना आई जवळ गेली. आईने पटापटा तिचे मुके घेतले, तिला जवळ घेत म्हणाली, “माझी गुणाची लेक”. एक पूर्ण दिवस दवाखान्यात आराम करून आई घरी परतली. मग आई घरातल्या कामात गढून गेली. पुढे एक दिवस बाबांनी मीनाला तिच्या मावशीची पावसात घडलेली जुनी घटना सांगितली. ज्यात आईच्या मोठ्या बहिणीचा म्हणजेच मीनाच्या मावशीचा मृत्यू झाला होता. त्या दुःखद गोष्टीचा आईच्या मनावर प्रचंड आघात झाला होता. म्हणूनच काळजीपोटी आई मीनाला पावसात जाऊ देत नव्हती. ही गोष्ट ऐकल्यावर मात्र मीना शहाणी झाली. त्यानंतर ती आईच्या समोर कधीच पावसात गेली नाही.

Comments
Add Comment

येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत

नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले