पिंपरी-चिंचवड : कोळी बांधवांची आराध्य दैवत असलेल्या आई एकविरा मंदिरात भाविकांना ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. त्यासंदर्भात आई एकवीरा देवीच्या संस्थानकडून पत्रक काढण्यात आले असून त्याची अंमलबजावणी भाविकांना ७ जुलै पासून करावी असे आवाहन करण्यात आले. स्थानिक दुकानदारांना आणि भाविकांना हा नियम लागू असणार आहे. मंदिराचं पावित्र राखण्यासाठी संस्थाकडून निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तोडके आणि अंग प्रदर्शन करणारे कपडे घालून आल्यास भाविकांना प्रवेश नाकारण्यात येईल अशी माहिती संस्थांकडून देण्यात आली.
तसेच परिपत्रकात उल्लेख केल्याप्रमाणे महिला, तरुणी, पुरुष, युवक यांनी कपडे परिधान करावेत. महिलांना मंदिरात प्रवेश करायचा असल्यास त्यांनी साडी, सलवार, कुर्ता, किंवा इतर भारतीय कपडे प्रधान करावेत. महिला आणि तरुणींनी पूर्ण अंग झाकलेले असावेत. तरुण युवक वर्ग आणि पुरुष यांच्यासाठी धोतर, पायजमा, कुर्ता, पॅन्ट, टी-शर्ट, शर्ट, किंवा इतर भारतीय कपडे परिधान केलेले असावेत. असा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे.
तरुण आणि तरुणींनी शॉर्टस, शॉर्ट स्कर्ट, वेस्टन कपडे, मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, हाफ पॅन्ट किंवा अंग प्रदर्शन करणारे कपडे घालू नयेत. अशी कपडे कुणी परिधान करून आढळल्यास त्या भक्ताला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. ड्रेस कोड हा बंधनकारक आहे. अशी माहिती आई एकविरा देवीच्या संस्थानकडून देण्यात आली. त्यामुळे परिपत्रकानुसार भाविकांनी नियम पाळावेत असे आवाहन देखील संस्थांकडून करण्यात आले आहे.






