Monday, June 30, 2025

बलरामाकडून ब्रह्महत्या व प्रायश्चित्त

बलरामाकडून ब्रह्महत्या व प्रायश्चित्त

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


बलराम श्रीकृष्णांचे मोठे बंधू तसेच दुर्योधन व भीम यांचे गुरू होते. दुर्योधन व भिमाला बलरामाने गदायुद्धाचे प्रशिक्षण दिले होते. जेव्हा कौरव पांडवामध्ये युद्ध होणार हे निश्चित झाले तेव्हा दोन्ही सैन्याची जुळवाजवळ करण्यासाठी भेटीगाठी घेणे सुरू होते. तेव्हा तटस्थ राहण्याच्या उद्देशाने बलराम तीर्थयात्रेला निघून गेले.


पृथूदक, बिंदूसर, त्रितकूप, सुदर्शनतीर्थ, विशालतीर्थ, ब्रह्मतीर्थ, चक्रतीर्थ आदी तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्यानंतर ते नैमिषारण्यात आले. नैमिषारण्यात ऋषीमुनींचे सतत वास्तव्य होते. बलराम आल्याचे पाहून सर्व ऋषीमुनींनी उठून त्यांचा आदर सत्कार व स्वागत केले. मात्र रोमहर्षण आपल्या आसनावरच बसून होता. रोमहर्षण हा क्षत्रिय पित्याच्या व ब्राह्मण मातेच्या पोटी सुतकुळात जन्मलेला पूत्र होता. महर्षी व्यासांचा शिष्य असलेला रोमहर्षण ज्ञानी, पुराण, धर्मशास्त्र आणि इतिहासाचा अभ्यासक होता. एवढे असूनही तो बलराम व त्यांच्यासोबत आलेल्या ब्राह्मणांच्या स्वागतासाठी न उठल्याने त्याचीही कृती गर्विष्ठपणाची असल्याचे बलरामला जाणवले. त्यामुळे त्याचे अध्ययन हे केवळ धार्मिकतेचे ढोंग आहे आणि जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाहीत ते अधिक पापी होत. त्यांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतार घेतला आहे असे म्हणून जरी बलराम तीर्थयात्रेसारख्या पवित्र कार्यात असले तरी त्यांनी दर्भाच्या साहाय्याने रोमहर्षणाला ठार केले.


हे पाहून सर्व मुनी हळहळले. तर देवांनी बलरामाला आपणच त्यांना हे ब्रह्मासन दिले असल्याचे सांगितले. त्यांची हत्या करून आपण अजाणतेपणाने का होईना ब्रह्महत्या केली आहे. आपण स्वत:च ज्ञानी आहात. तेव्हा आपण स्वतःच या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त घ्यावे असे सांगितले. तेव्हा बलरामाने देवताना प्रथम श्रेणीचे कोणते प्रायश्चित्त घ्यावे, अशी विचारणा केली. तुम्ही या सुताला काय देऊ इच्छिता ते सांगा. ते मी सर्व त्याला देईन असेही आश्वासन दिले, तसेच रोमहर्षणच्या जागी त्यांचा पुत्र तुम्हाला कथा सांगेल व तो दीर्घायुषी व बलशाली होईल, असे सांगून पुन्हा आपल्या प्रायश्चिताबद्दल विचारणा केली.


तेव्हा ऋषी म्हणाले, बल्व नावाचा एक दानव यज्ञाच्या पर्व काळी येऊन कुंडात रक्त, मांस, मलमूत्र टाकून दूषित करतो. आपण त्याला ठार करा व त्यानंतर एक वर्ष भारतवर्षाची प्रदक्षिणा केल्यास आपण ब्रह्महत्तेच्या पापातून मुक्त व शुद्ध व्हाल. बलरामाने ऋषींचे म्हणणे मान्य केले. ऋषींनी यज्ञ आरंभ केला. पर्वकाळ सुरू होताच एका मोठ्या वादळासह बल्व दानव आला. सर्वत्र दुर्गंधी येऊ लागली. त्याने यज्ञाच्या स्थळी मलमूत्र, रक्त, मांस टाकले. अवाढव्य व काळ्याकुट्ट शरीराचा लालबुंद दानव त्रिशुळासह प्रकट झाला. बलरामाने आकाशात संचार करणाऱ्या बल्वला नागराने ओढून त्याच्या डोक्यावर मुसळाचा घाव घालून त्याला ठार केले व ऋषींना भयमुक्त केले. ऋषींनी बलरामाची स्तुती करून त्याला दिव्य वस्त्रे व अलंकार अर्पण केले. तसेच कधीही न कोमेजणाऱ्या कमळाची वैजयंती माळ दिली.


त्यानंतर बलरामाने तेथून रोमहर्षणाच्या हत्तेच्या पातकाचे प्रायश्चित घेण्याकरिता तीर्थयात्रेसाठी प्रयाण केले. अद्भुत करणी करणाऱ्या बलरामाच्या चरित्राचे सकाळ-संध्याकाळ स्मरण करणारा भगवंताला प्रिय होतो असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.

Comments
Add Comment