Saturday, September 13, 2025

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता
बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला. मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर सलग दुसरा विजय मिळवून इंग्लंड आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर झाला असला तरी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला खेळवणार की त्याला विश्रांती देणार यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश केला आहे. यामुळे पिछाडीवर असलेला भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी बुमराहला संघात घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी मालिका सुरू होण्यापूर्वीच पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या कसोटीत बुमराह उपलब्ध असेल असे जाहीर करण्यात आले होते. यामुळे बुमराहला खरंच विश्रांतीची आवश्यकता आहे का आणि त्यामुळे फायदा होईल की तोटा यावरुन चर्ता सुरू आहे. जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १ जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत ४१०.४ षटके टाकली आहेत. जी क्रिकेट विश्वातील कोणत्याही वेगवान गोलंदाजापेक्षा जास्त आहेत. बुमराहने या काळात कसोटी क्रिकेटमध्ये ७८ बळी घेतले आहेत. बुमराह भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे. याआधी २०२० - २१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बुमराह सलग पाच कसोटी सामने खेळला. कसोटीत सतत वेगवान गोलंदाजी केल्यामुळे त्याला दुखापत झाली होती. हा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पाच पैकी तीन कसोटीतच बुमराहला खेळवण्याचे नियोजन भारतीय संघ व्यवस्थापन करत आहे.
Comments
Add Comment