कलावंताला जेव्हा ‘डॉक्टराश्रय’ मिळतो...

राजरंग : राज चिंचणकर


ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे हे रंगभूमीवर ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे नाट्य सादर करत असतात. आतापर्यंत त्याचे अनेक प्रयोग झाले आहेत आणि रसिकांच्या ते पसंतीसही उतरले आहेत. विविध नाटकांच्या दरम्यान त्या-त्या कलाकारांना अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते आणि यातले काही प्रसंग त्या कलाकारांच्या कायम स्मृतीत राहतात. रमेश भिडे यांच्या बाबतीतही असाच एक प्रसंग घडला आणि या नाट्यकृतीच्या दरम्यान त्यांना चक्क ‘डॉक्टराश्रय’ लाभला. याविषयी बोलताना ते सदर प्रसंग डोळ्यांसमोर उभा करतात. त्या प्रसंगांचे वर्णन त्यांच्याच शब्दांत...


आठवणी माणसांच्या स्मृती जागृत करतात आणि आठवणी जागृत झाल्या की, मनाला निराळा आनंद मिळतो. चांगल्या आठवणींची साठवण आपल्याकडे जास्तीत जास्त असायला हवी. आता या सगळ्याची आठवण व्हायचे कारण म्हणजे तरळे, सिंधुदुर्ग येथे झालेला ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा आमचा प्रयोग आणि या प्रयोगाच्या वेळी तिथे मला भेटलेली एक अवलिया व्यक्ती...! नाट्य व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही गावागावांतून फिरतो. निरनिराळी माणसे आम्हाला भेटतात. त्यांचे विचार ऐकायला मिळतात आणि रोज आमच्या ज्ञानात भर पडत राहते, तर देवगड येथील प्रसिद्ध कवी प्रमोद जोशी यांच्या ओळखीमुळे आमचा हा प्रयोग ठरला होता. प्रयोग करून घेणारे जे गृहस्थ होते, त्यांचाशी माझा परिचय नव्हता. अर्थात तिथे गेल्यानंतर तो झाला. गप्पांच्या ओघात त्यांच्याकडून एक गोष्ट समजली. त्या गावात नानीवडेकर नावाचे एक प्रसिद्ध गझलकार होते. उच्च दर्जाच्या गझलची रचना करणारे अशी त्यांची ख्याती होती. या गझलकारांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर, ‘मधू कट्टा’ नावाची संस्था स्थापन करून त्या गृहस्थांनी दर महिन्याला एक उत्कृष्ट प्रतीचा कार्यक्रम गावच्या लोकांना दाखवण्याचा संकल्प केला होता, तर त्या एका वर्षाचा शेवटचा कार्यक्रम आमच्या नाटकाने होणार होता.


आमचा प्रयोग सुरू होण्यापूर्वी आम्ही त्या गृहस्थांच्या घरी चहापाण्यासाठी गेलो. आमच्या खूप गप्पा झाल्या. तिथून निघताना त्यांनी माझ्या हातात मानधनाचे पाकीट ठेवले. प्रयोगाच्या मानधनाची विचारणा त्यांनी सुरुवातीलाच केली होती. मानधनाबाबत जेव्हा मला विचारण्यात आले होते, तेव्हा ‘काय द्यायचे ते द्या’, असे मी त्यांना सांगितले होते. पण प्रयोग करायचा हे नक्की ठरले होते. यात विशेष असे की, अनेकदा प्रयोग संपल्यानंतर सुद्धा लोक मानधन देण्यासाठी विलंब करतात, पण इथला अनुभव मात्र निराळाच होता. प्रयोग संपल्यानंतर एक उत्कृष्ट प्रतीची शाल घालून त्या गृहस्थांनी माझा सत्कार केला. मला जे मानधन दिले गेले होते, ते त्या गृहस्थांनी स्वतःच्या खिशातून दिले होते. मित्रप्रेमाचे हे जिवंत उदाहरण होते आणि मित्रांच्या आठवणी कशा जागवाव्यात, यासाठी घालून दिलेला तो वस्तुपाठ होता.


हे सर्व सुरू असताना मला मात्र आठवण येत होती, ती बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी बालगंधर्वांना दिलेल्या राजाश्रयाची...! बालगंधर्व यांच्यावरचे एक पुस्तक एका गृहस्थांनी मला वाचायला दिले होते. त्या पुस्तकात असा उल्लेख होता की, बडोद्याचे महाराज गायकवाड यांच्या राज्याचा बालगंधर्वांच्या कंपनीला ‘राजाश्रय’ होता. सगळी संस्थानेनंतर खालसा झाली आणि त्या काळातला जो राजेपणाचा रुबाब होता, तोही संपला. काळाच्या ओघात सर्व काही बदलत गेले; तसा ‘राजाश्रय’ हा शब्दही संपून गेला. चौथी किंवा पाचवीत आम्हाला एक कविता होती. त्या कवितेची मला क्षणभर आठवण झाली. ‘वन सर्व सुगंधित झाले, फूल कोठे न कळे फुलले...!’ बालगंधर्व हे महान होते, पण आमच्यासारखे जे किरकोळ सादरकर्ते या भूतलावर वावरत आहेत; त्यांनाही आश्रय देऊन मोठे करण्यासाठी धडपडणारी माणसे या जगात असतात. फक्त ती कुठे लपलेली असतात, हे कळण्यासाठी आपल्या गाठीशी फार मोठी पुण्याई किंवा लोकसंपर्क असावा लागतो आणि म्हणून मला आठवण झाली त्या कवितेची...! बालगंधर्वांना ‘राजाश्रय’ मिळाला आणि आम्हाला ‘डॉक्टराश्रय’ मिळाला. मी असे म्हणतो कारण आमच्या कलेला आश्रय देणारे ते गृहस्थ डॉक्टर होते आणि हे डॉक्टर म्हणजे तरळे मुक्कामी स्वतःचे हॉस्पिटल उभारून सज्जनपणाने आपली डॉक्टरकी करणारे डॉ. मिलिंद कुलकर्णी...! त्यांनी विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला स्मृतीत आणण्याचे कार्य केले. त्यांची ही आठवण आणि हा प्रसंग कधीही विसरता येणार नाही.

Comments
Add Comment

नाईलाजाच्या प्रदेशातील तीन डिसेबल्स

भालचंद्र कुबल यंदाच्या आय. एन. टी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मी या स्पर्धेत

मराठी रंगभूमीचा एकमेव ‘सूत्रधार’...

रंगभूमीवर नाटकांचे सूत्रधार अनेक असतात, पण मराठी रंगभूमीला एखादा सूत्रधार असू शकतो का; या प्रश्नाचे उत्तर आता

मराठी चित्रपटात नावीन्य हवे

युवराज अवसरमल नावीन्याचा ध्यास घेऊन नवीन कलाकृती दिग्दर्शित करणारे अभिनेते व दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील

नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘रावण कॅालिंग’

मराठी पडद्यावर लवकरच एका थ्रिलर, कॅामेडी सिनेमाची एंट्री होणार असून येत्या नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६

‘रणपति शिवराय : स्वारी आग्रा’, शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प १९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने

घटस्फोटातील नात्याची गोष्ट…!

मी मागे माझ्या एका लेखामधे म्हटले होते की, राज्यनाट्य स्पर्धेमधील काही नाटके व्यावसायिक दर्जाची असतातच. त्याला