Saturday, June 28, 2025

अमरावतीत भर रस्त्यात पोलिस अधिकाऱ्याची हत्या

अमरावतीत भर रस्त्यात पोलिस अधिकाऱ्याची हत्या

पहिलं कारने उडवलं, नंतर सपासप वार करून हल्लेखोर पसार


अमरावती: अमरावतीमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली आहे. एका चारचाकी कारने दुचाकीस्वार पोलीस अधिकाऱ्याला उडवले. त्यानंतर त्यांच्या पोटावर, छातीवर धारदार शस्त्राने वार करून हल्लेखोर पसार झाले. मात्र काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.

अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत वलगाव पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादर कार्यरत होते. हल्ल्यानंतर त्यांना नजीकच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. एका पोलिस अधिकाऱ्याचीच अशा पद्धतीने हत्या करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अमरावती पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल 


पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया दाखल झाले आहेत. पाच ते सहा हल्लेखोर यामध्ये असल्याची माहिती असून ते फरार झाले आहेत. फरार हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी लगोलग दोन पथके रवाना केली असून, काही तासांतच पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

दोन आरोपींना अटक


हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २० जून रोजी अब्दुल कलाम यांच्या भावाचा  काही लोकांशी पैशावरून वाद झाला होता, त्यावेळी अब्दुल कलाम हे मध्यस्थी करायला गेले होते. त्याचा राग धरून ही हत्या झाल्याची माहिती आहे.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा