Thursday, October 30, 2025
Happy Diwali

झाडे लावा, झाडे वाचवा

झाडे लावा, झाडे वाचवा

रवींद्र तांबे

मनुष्याला आपले जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा दिल्या आहेत. त्यामुळे जे काय मनुष्याचे अस्तित्व आहे ते झाडांमुळेच. तेव्हा मनुष्याला ज्या प्रमुख जीवनावश्यक वस्तू मिळतात त्या झाडांमुळे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा असे म्हणत असतो. अशी मोहीम शासकीय स्तरावर सुद्धा करण्यात आली आणि आजही ती चालू आहे. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. दिवसेंदिवस झाडांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे आता झाडे लावा, झाडे वाचवा अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे. तेव्हा हा संशोधनाचा महत्त्वाचा भाग जरी असला तरी प्रत्येकाने पावसाळ्यात किमान एक तरी झाड लावले पाहिजे. जी झाडे तोडली जातील त्यांना विरोध केला पाहिजे. एक झाड तोडल्यास किमान दोन झाडे लावली पाहिजेत. तरच झाडे वाचतील आणि पर्यावरणपूरक वातावरण राहील.

पृथ्वीवर आज जे काही मानवाचे अस्तित्व आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे वृक्ष. त्यासाठी नागरिकांना झाडांचे महत्त्व समजून सांगितले पाहिजे. आज राज्यातील प्रत्येक गावामध्ये 'झाडे लावा, झाडे वाचवा' हा उपक्रम राबविला गेला पाहिजे. तसेच या उपक्रमाबरोबर आज पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ‘एक व्यक्ती एक झाड’ लावले पाहिजे. हा उपक्रम प्रत्येक घराघरात राबवायला हवा. तरच वाढत्या तापमानाला आळा बसेल. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. तरच नागरिक झाडे लावण्यास व त्यांचे संगोपन करण्यास प्रोत्साहित होतील. तेव्हा झाडे लावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. झाडांचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले पाहिजे. आपण झाडांशिवाय जगू शकत नाही. हे नागरिकांना पटवून सांगितले पाहिजे. गावात झाडे वाचविण्यासाठी जनजागृती रॅली काढली पाहिजे. गावामध्ये मोक्याच्या ठिकाणी झाडांचे महत्त्व सांगणारे फलक लावले पाहिजेत. गावातील नागरिकांना जागृत करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्याख्याने आयोजित करावीत. गाव पातळीवर प्रत्येक घरानुसार झाडांचे वाटप करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडांची लागवड करावी. मात्र याचे आजच्या नवीन पिढीला काहीही देणे-घेणे नाही असेच दिसते. घरात कृत्रिम थंडगार हवा असली म्हणजे झाले. त्यासाठी आई-वडील काय करतात त्याचे त्यांना काहीच देणे नसते. झाडे लावण्यापेक्षा घरात मनीप्लँट लावणे मुले पसंत करतात. म्हणे यामुळे घरात पैसा येतो, इतका अडाणीपणा. तेव्हा सर्वांनी झाडांचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. पुढील वर्षी असे न म्हणता, या वर्षापासून मी झाडे लावून त्यांचे मी संगोपन करेन असे ध्येय प्रत्येकांनी ठेवले पाहिजे. कारण आपल्याला झाडे प्राणवायू देत असतात याची जाणीव असायला हवी. एकवेळ घनदाट दिसणारी हिरवीगार जंगले आता ओसाड दिसत आहेत. ज्याठिकाणी सुपीक जमीन होती त्या जमिनीतून शेतकरी राजा सोन्याचे गोठे पिकवत होता. आता त्याठिकाणी सिमेंटच्या गगनचुंबी इमारती दिसत आहेत. याचे कारण मानवाच्या गरजांमुळे झाडांची कत्तल होताना दिसत आहे. त्यामुळे जास्त उकाडा आणि पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण याला आपणच जबाबदार आहेत. झाडांमुळे आपल्याला पुरेशी शुद्ध हवा, पिण्यासाठी पाणी व हवामान नियंत्रित करण्यात मदत होते. कारण झाडे ही नैसर्गिक संसाधने मानवाला पुरवीत असतात. आतापर्यंत आपण झाडे लावा, झाडे जगवा असे पावसाळा सुरू झाल्यावर म्हणत होतो. आता तसे म्हणून चालणार नाही. तसेच झाडांना खड्डे खोदून चालणार नाही.

अलीकडे खोदलेले खड्डे सुद्धा चोरीला जातात. तेव्हा अगोदर झाडांची रोपे घेऊन येऊन जसे खड्डे खोदले जातील त्याप्रमाणे रोपे सुद्धा लावली पाहिजे. झाडांच्या सुरक्षिततेसाठी कुंपण सुद्धा घातले पाहिजे. झाडे लहान असताना त्याची देखभाल करावी. तसेच झाडे मोठी झाल्यावर ती तोडणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी.

आपण सर्वजण दरवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करीत असलो तरी जागतिक तापमानात वाढ होत आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच या दिवशी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पर्यावरणविषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस आपल्या देशात ‘जंगले निसर्ग तुमच्या सेवेत’ आणि ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात करा’ या थीमसह आयोजित केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाची आपल्या देशातील थीम लक्षात घेऊन देशातील तापमानाचा विचार करता पुढील वर्षी ‘झाडे लावा, झाडे वाचवा’अशी थीम भारत सरकारने जाहीर करावी. त्या अगोदर देशातील प्रत्येक नागरिकांनी झाडे लावा,स झाडे वाचवा वचन बद्ध होऊ या.

Comments
Add Comment