Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्यांचे खोल समुद्रात होणार विसर्जन

मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्यांचे खोल समुद्रात होणार विसर्जन

पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर मंडळांना मिळणार दिलासा

मुंबई : ‘पीओपी’वरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्या खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२७) सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिले.

‘पीओपी’वर बंदी आल्यामुळे राज्यातील मूर्तिकार आणि त्यावर विसंबून असणारे सर्व घटक यांचा रोजगार धोक्यात आला होता. याप्रकरणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी पुढाकार घेतला. त्यातच न्यायालयाने ‘पीओपी’वरील बंदी उठली आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपी गणेशमुर्त्या विसर्जन करण्याबाबत सरकारला आपली भूमिका न्यायालयात मांडत आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मंत्री शेलार यांच्यासह नगर विकास, पर्यावरण, नगरपालिका, महापालिका, यासंबंधीत प्रशासकीय अधिकारी आणि राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पीओपी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेली मार्गदर्शक तत्वे तसेच न्यायालयाने दिलेले आदेश, डॉ. काकोडकर समितीने केलेला अभ्यास व त्याचा अहवाल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. काकोडकर समितीच्या अभ्यासानुसार, ‘मोठ्या मुर्त्यांचे खोल समुद्रात विसर्जन होऊ शकते, त्यादृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे, याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

घरगुती गणेशाच्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जातात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबाबत ही राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाने सकारात्मक दिसून येते आहे. तर छोट्या मुर्त्यांनाही समुद्रात विसर्जन करण्याबाबतचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.

सर्वंकष धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मोठ्या मुर्ती खोल समुद्रात विसर्जन करण्याबाबत एक सकारात्मक चर्चा झाली. काकोडकर समितीचा अहवाल, राष्ट्रीय हरित लवादाची मार्गदर्शक सूचना आणि गणेशोत्सवाची प्रथा परंपरा, विसर्जनाची पध्दती याचा विचार करुन एक सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली.

सरकार मुर्तीकारांच्या खंबीर पाठीशी मुंबईच्या गणेशोत्सवाची प्रथा परंपरा आणि त्याचा एक समृद्ध इतिहास त्याच्याशी जोडलेली लोक भावना आणि जगभरात या उत्सवाची असलेली ख्याती याच्यात कोणतेही विघ्न न येता या सगळ्यात सकारात्मक तोडगा निघेल, सरकार पुर्णपणे सकारात्मक आहे, उत्सव आणि मुर्तीकारांच्या खंबीर पाठीशी आहे, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment