पनवेल : तक्का परिसरातील स्वप्नालय नावाच्या संस्थेजवळ बास्केटमध्ये बेवारस अवस्थेत अर्भक आढळले. ही घटना शनिवार २८ जून २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने अर्भक कोण सोडून गेले याचा तपास करत आहेत.
बास्केटमध्ये अर्भकाजवळ एक इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी होती. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बाळाचा सांभाळ करणे शक्य नसल्यामुळे त्याला असे सोडण्याचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद आहे. बास्केटमध्ये बाळाजवळ सेरेलॅक तसेच बाळाचे कपडे पण ठेवलेले आढळले. चिठ्ठी लिहिणाऱ्या अज्ञात व्यक्तीने बाळाचा सांभाळ करण्यास आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. बाळाची काळजी घ्या, भविष्यात शक्य झाल्यास बाळाला भेटेन, कृपया मला माफ करा; असेही चिठ्ठीत पुढे नमूद आहे.
अर्भकाला बास्केटमध्ये ठेवून ते बास्केट बेवारस अवस्थेत कोण आणि किती वाजता सोडून गेले हे अद्याप समजलेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. डॉक्टरांनी तपासणी करुन बाळाची तब्येत स्थिर असल्याची माहिती दिली. सध्या पोलीस प्रशासनाच्या देखरेखीत बाळ सुरक्षित आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला असून बाळाच्या पालकांचा शोध सुरू आहे.