Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे २६ जून २०२५ रोजीचे ५.३० पासून ते २८ जून २०२५ रोजी ११.३० पर्यंत ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) वाशिम जिल्ह्यात ५२.८ मिमी पाऊस झाला आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात ४४.८, वर्धा जिल्ह्यात ३९.२ मिमी, जळगाव २८.२, आणि रायगड जिल्ह्यात २६.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १६.४, रायगड २६.७, रत्नागिरी १२.८, सिंधुदुर्ग १३.६, पालघर १९.३, नाशिक ८.२, धुळे १०.५, नंदुरबार २, जळगाव २८.२, अहिल्यानगर १.२, पुणे ८.६, सातारा ४, सांगली १.७, कोल्हापूर ८.९, छत्रपती संभाजीनगर १७.४, जालना १५.२, बीड १.६, लातूर १.२, धाराशिव ०.४, नांदेड ३, परभणी ९.१, हिंगोली १४.८, बुलढाणा ४४.८, अकोला ११.९, वाशिम ५२.८, अमरावती १४.८, यवतमाळ १९.७, वर्धा ३९.२, नागपूर ११.२, गोंदिया ०.२, चंद्रपूर ८.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १२.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे शेड पडून यवतमाळ जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू, वर्धा जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती व एक प्राण्याचा मृत्यू, बुलढाणा जिल्ह्यात पुरात वाहून एक व्यक्ती व दोन प्राण्यांचा मृत्यू आणि मुंबई शहर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी झाली आहे.

सातारा जिल्ह्यात निरा नदीत माउलींच्या पादुका शाही स्नानासाठी घेऊन गेले असताना एका बुडणाऱ्या तरुणाला रेस्क्यू टीमद्वारे वाचवण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील देवळीमधील दिगडोह येथे तीन शाळकरी मुले पुराच्या पाण्यामध्ये अडकली होती त्यांना देवळी नगरपालिका व फायर ब्रिगेड यांनी सुरक्षितपणे वाचवले.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील समृद्धी महामार्ग साब्रा-फर्दापूर इंटरचेंजजवळ पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटीसारख्या मुसळधार पावसामुळे पुलाखाली पाणी साचले, ज्यामुळे पाणी वाहताना दिसू लागल्याने वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. तसेच याठिकाणी जवळच्या शेतीचे नुकसान झाले असल्याचे राज्य आपत्कालीनकार्य केंद्राने कळविले आहे.

Comments
Add Comment