Friday, August 15, 2025

मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, ५ जुलैला मुंबईत एकच अन् एकत्र मोर्चा निघणार; राऊतांची घोषणा

मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, ५ जुलैला मुंबईत एकच अन् एकत्र मोर्चा निघणार; राऊतांची घोषणा

मुंबई : हिंदी भाषेच्या सक्तीविरीधात ठाकरे बंधू एकत्र येणार असं राज्यसभा खाजदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टद्वारे म्हटलंय. राज्य सरकारने नवीन शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्याविरोधात राज्यातील शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधून विरोध अधिकच तीव्र झाला आहे. आता हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून निघणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) पुरस्कृत मोर्चा ५ जुलैला तर ७ तारखेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार असणार आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रतील शाळात हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.



एकच आणि एकत्र मोर्चा निघेल


महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईमधील गिरगाव चौपाटी येथे भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने ७ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र मराठीच्या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मोर्चे कशासाठी असा प्रश्न या घोषणांनंतर उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सकाळी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एकत्रच मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित छायाचित्रासह केलेल्या या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी ‘’महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’’ असे म्हटले आहे.




 

मनसेचे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?


मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणं गरजेचं आहे, असं मला वाटत. राज ठाकरे यांनी काल आवाहन केलं होतं, त्याला समोरुन प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेची सक्ती आणि लादण्याचा प्रयत्न होतोय, त्याविरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही. मराठी भाषेपुढे कोणीही छोटं-मोठं नाही, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी राज ठाकरे सकारात्मक आहेत, आम्ही सगळे सकारात्मक आहोत.५ जुलै रोजी हा मोर्चा एकत्रितपणे निघेल, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा