
पावसाळ्यात पूल सुरू करणार : संजय मुखर्जी
मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पस्थळास डॉ.संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए आणि विक्रम कुमार, अतिरिक्त महानगर आयुक्त (१) एमएमआरडीए यांनी भेट देऊन अंतिम तयारीचा आढावा घेतला. हा ब्रीज पावसाळ्यातच हा जनतेच्या सेवेत सुरू करण्यात येईल, असे मुखर्जी यावेळी म्हणाले.
डॉ. संजय मुखर्जी यावेळी म्हणाले की, ‘या आयकॉनिक ब्रीजचे काम आता अंतिम टप्प्यात असून तो नागरिकांच्या सेवेत लवकरच सुरू करण्यात येणार आहे. हा पूल केवळ वाहतूक कोंडीवरचा उपाय नसून मुंबईसाठी एक नवा लँडमार्कदेखील आहे. नाविन्य आणि परिणामकारकतेचा संगम साधणारे हे उत्तम उदाहरण आहे. मुंबईच्या 'सिमलेस कनेक्टिव्हिटी'च्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.
हा ब्रीज तयार झाल्यामुळे कुर्ला ते विमानतळ सिग्नल-विरहित वाहतूक करता येणार आहे. वाकोला, बीकेसी आणि एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार,त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाचणार आहे.
सध्या सुरू असलेली कामे
- सूचना फलक बसविणे
- केबल-स्टे ब्रीजखालील तात्पुरते दिलेले आधार काढणे
- रंगकाम व अंतिम सौंदर्यीकरण
- स्ट्रीट लाईट आणि मध्यवर्ती लँडस्केपिंग
अभियांत्रिकी वैशिष्ट्ये
- दक्षिण आशियातील पहिला अशा प्रकारचा केबल-स्टे ब्रिज.
- २१५ मीटर लांबीचा ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक असलेला पूल.
- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील उड्डाणपुलावरून जाणारा ब्रीज.