Sunday, October 26, 2025
Happy Diwali

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा

मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प रखडणार याची दक्षता घेत पुढील तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज विधानभवनातील कॅबिनेट सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुहेरी बोगदा हा ११.८४ किलोमीटर लांबीचा असणार आहे. त्यामुळे बोगद्यात हवा खेळती राहिली पाहिजे. त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी. प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वन विभागाची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी, रात्रीला काम करण्याची परवानगी घेण्यात यावी. बोरिवली बाजूकडील काम गतीने पुढे जाण्यासाठी आणि या बाजूकडील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवून एक महिन्यात कार्यवाही पूर्ण करावी.

यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सबंधित अधिकाऱ्याने एक महिना कारवाई करीत पुनर्वसन पूर्ण करावे. बोरिवली बाजूकडील अदानी, टाटा पॉवर प्रकल्पातील आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करावे. तसेच भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला रस्त्याचे अंतिम नियोजन द्यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सादरीकरण केले. बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक रामराव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संचालक अनिता पाटील, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

असा आहे दुहेरी बोगदा..

ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा 11.84 किलोमीटर लांबीचा आहे. प्रकल्प दोन पॅकेज मध्ये उभारण्यात येणार आहे. बोरिवली बाजूने 5.75 किलोमीटर पॅकेज एक आणि ठाणे बाजूने 6.09 किलोमीटर पॅकेज दोन असणार आहे. पॅकेज एक मध्ये 6 हजार 178 कोटी आणि पॅकेज दोन मध्ये 5 हजार 879 कोटी अशाप्रकारे एकूण 12 हजार 57 कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कार्बन उत्सर्जन 1.4 लाख मॅट्रिकने टन प्रतिवर्ष कमी होणार आहे. सध्याच्या रस्त्याने ठाणे ते बोरिवली जायला एक ते सव्वा तास लागतो. बोगदा पूर्ण झाल्यानंतर हा कालावधी 15 मिनिटांवरती येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर इंधनही वाचणार आहे.

Comments
Add Comment