योगनिद्रा

  63

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके


गील दोन लेखांत आपण शवासनामधील आदर्श शारीरिक स्थिती आणि त्याचप्रमाणे मनाच्या आधारे आणि इच्छाशक्ती, सूचनाशक्ती यांच्या आधारे शरीराच्या विविध अवयवांचं‌ शिथिलीकरण करण्याची पद्धत सविस्तर पाहिली. अशारीतीने शरीर जेव्हा शिथिल होतं, श्वासगती नियमित होते आणि त्यामुळे मनही शांत होतं तेव्हा या आदर्श स्थितीत, शरीराच्या स्वास्थ्यासाठी आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मनाला सकारात्मक सूचना दिल्या जातात. याच शिथिलीकरणाच्या पद्धतीला योगनिद्रा असं म्हणतात.


मानवी मनाची आणि बुद्धीची ताकद प्रचंड आहे. संकल्पशक्ती, इच्छाशक्ती या मनाच्या शक्ती आहेत तर ग्रहणशक्ती, धारणाशक्ती, कल्पनाशक्ती, आज्ञाशक्ती या बुद्धीच्या शक्ती आहेत. या शक्तींना ओळखून त्यांचा योग्य कार्यांसाठी विनियोग करता येतो. परंतु नित्य जीवनामध्ये दगदगीमुळे निर्माण होणारे अनावश्यक विचार व त्यातून उत्पन्न होणारे ताणतणाव यामुळे मनाची आणि बुद्धीची ही शक्ती झाकोळून जाते. मनाच्या आणि बुद्धीच्या या शक्तींना जागृत करणं आणि त्यांचा आपल्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीसाठी युक्तीनं वापर करणं योगनिद्रेद्वारे शक्य आहे.


योगनिद्रा करण्याचा क्रम पुढीलप्रमाणे :




  • शारीरिक शिथिलीकरण - शारीरिक शिथिलीकरणाची प्रक्रिया आपण शवासन - भाग दोन या लेखात पाहिली आहे.

  • मानसिक शिथिलीकरण - शरीर स्थिर आणि शिथिल झालं की नियमित होणाऱ्या श्वासाची जाणीव ठेवावी. श्वास नियमित आणि मंद होऊ लागला की हळूहळू मनातील विचारांची गतीही कमी होते. मन अधिक केंद्रित करण्यासाठी श्वासावर लक्ष द्यावं. श्वास घेताना जाणवणारा हवेचा गारवा आणि श्वास सोडताना जाणवणारी श्वासाची ऊब अनुभवावी. असं केल्यानं मन एकाग्र होतं आणि विचार ग्रहण करण्यास समर्थ होतं. जो विचार मनाला अशा अवस्थेत देऊ तो विचार मन पटकन् स्वीकारतं आणि म्हणूनच साधकानं सकारात्मक संकल्प करावा.

  • संकल्प म्हणजे श्रद्धापूर्वक केलेला, सकारात्मक, दृढनिश्चयी विचार. संकल्प छोटा असावा. सतत बदलू नये. जसं - ‘माझे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय चांगले होत आहे’ किंवा ‘मला प्रचंड आत्मविश्वास प्राप्त होत आहे’, इत्यादी. मन ग्रहणशील असताना केलेले संकल्प बाह्यमन तर स्वीकारतच परंतु असे संकल्प अंतर्मनातही झिरपतात आणि दूरगामी, सकारात्मक परिणाम करतात. अंतर्मनाचं सामर्थ्य बाह्यमनापेक्षा पुष्कळ असतं.

  • भावनिक शिथिलीकरण - मनात संकल्पाची रुजवात केल्यानंतर आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींवर जसं आपली आवडती देवता, आपल्यासाठी आदर्श असलेलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व, सूर्योदय, सूर्यास्त, सुंदर मंदिर, घंटानादासारखे मधुर नाद, आपलं आवडतं फूल, सरोवर, समुद्र इत्यादींवर लक्ष केंद्रित करावं. या धारणेतील विषय आपल्या आवडीचा असल्यामुळे आपोआपच मनाला आनंद मिळतो. त्यामुळे भावनेच्या पातळीवर शिथिलतेचा अनुभव येतो. मात्र योगनिद्रेच्या या पातळीवर भावना उद्दीपित करणारे विषय टाळावेत.

  • पुन्हा संकल्प - अशारीतीने हळूहळू शारीरिक, मानसिक, भावनिक शिथिलीकरण झालं की उत्साह आणि आनंदाची जाणीव होते. अशा स्थितीत सुरुवातीचा संकल्प पुन्हा एकदा करावा.

  • काही क्षण याच अवस्थेत आनंदाचा अनुभव घ्यावा. पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रितकरावं. हातापायांच्या बोटांत थोडीशी हालचाल करावी. सावकाश एका कुशीला वळावं आणि डोळे न उघडता सावकाश उठून बसावं. दोन्ही तळहात एकमेकांवर चोळून काही क्षण ते डोळ्यांवर ठेवावेत आणि सावकाश डोळे उघडावेत आणि आनंदाचा, चैतन्याचा अनुभव घ्यावा.
    ही संपूर्ण प्रक्रिया साधारणतः ३० ते ४० मिनिटांची असते.


लाभ :

  • योगनिद्रेचा तत्काळ जाणवणारा लाभ म्हणजे शरीर आणि मनाला मिळणारी विश्रांती आणि पर्यायाने मिळणारी शांतता आणि आनंद. या विश्रांतीमुळेच मन आणि शरीर ताजातवानं होतं, अधिक कार्यक्षम होतं. स्वाभाविकच याचा सकारात्मक परिणाम शरीराच्या मज्जासंस्था, अंत:स्त्रावीग्रंथी, रक्ताभिसरणसंस्था इत्यादी विविध संस्थांच्या कार्यावर होतो.

  • रक्तदाब, शारीरिक आणि मानसिक ताण, डोकेदुखी, तसेच हृदयरोगावर प्रतिबंधक म्हणून योगनिद्रेचा पुष्कळ उपयोग होतो.

  • निद्रानाश किंवा वारंवार झोपमोड होणं या समस्यांवर योगनिद्रा हा प्रभावशाली उपाय आहे.

  • शरीर कार्यक्षम आणि मन अधिकाधिक दक्ष होतं. एखाद्या विषयावर पटकन् केंद्रित होतं. विषयाचं आकलन लवकर होतं, पटकन् निर्णय घेणं शक्य होतं. आत्मविश्वास प्राप्त होतो. शवासन आणि योगनिद्रा यांमुळे चैतन्याचा आणि आनंदाचा अनुभव येत असल्यामुळे योगाचार्य निंबाळकर या आसनाला ‘चैतन्यासन’ असे म्हणतात तर योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे याला ‘आनंदासन’ असं म्हणतात. ही दोन्ही नावं शवासन आणि योगनिद्रेचा नेमकं स्वरूप व्यक्त करणारी आहेत.
    महत्त्वाचं लक्षात ठेवावं असं -

  • आनंदासन करताना सुरवातीला आपल्या आपण मनाला सूचना देऊन शिथिल करणं जमत नाही. तेव्हा योगनिद्रेचा अभ्यास असलेल्या तज्ज्ञांच्या मदतीनं आनंदासन करावं. सूचनांचं तंत्र योग्य पद्धतीनं शिकल्यावर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव केल्यावर स्वयंसूचनांच्या आधारे आनंदासनातील शिथिलीकरण करणं योग्य ठरेल.

  • आनंदासन करताना सुरुवातीला झोप लागण्याची शक्यता असते. झोप लागली तर त्याबद्दल अपराधीपणाची जाणीव ठेवू नये. मात्र या प्रक्रियेत तंत्राच्या दृष्टीनं झोप लागणं ही योग्य स्थिती नाही. मनाला जागृत ठेऊन शिथिल करणं आणि सकारात्मक विचार मनामध्ये रुजवणं हे या आसनाचं उद्दिष्ट विसरू नये. पुष्कळ झोपूनही मनाला जी विश्रांती मिळत नाही ती थोडा काळ केलेल्या योगनिद्रेमध्ये मिळते हे साधकांनी लक्षात ठेवावं. योगनिद्रा ही आपल्या परंपरेने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. एकही पैसा खर्च न करता पुष्कळ आणि दीर्घकालीन फल देणारं असं हे योगनिद्रेचं तंत्र आत्मसात करून नित्य आनंदी आणि चैतन्यानं परिपूर्ण राहावं.

Comments
Add Comment

अवतरली...लाडाची नवसाची गौराई माझी

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर गणेशोत्सवात गौरीपूजन हा स्त्रियांसाठी अत्यंत मंगलमय व आनंदाचा सण मानला जातो.

दृकश्राव्य माध्यमातील सृजनशील दुवा

कर्तृत्ववान ती राज्ञी : उमा दीक्षित आज हरतालिका या दिवसाचे औचित्य साधून, गेली तीन दशके अखंड व्रतस्थ

उकडीचे मोदक

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर

समाधी अवस्था

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके आपण मागील काही लेखांत योगदर्शनातील धारणा, ध्यान या अंतरंगयोगातील दोन महत्त्वाच्या

हर तन तिरंगा

तिरंगी फॅशन ट्रेंड!  सौंदर्य तुझं : प्राची शिरकर स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव!

दिव्यांगांसाठी आदर्श ‘घरकुल’

वैशाली गायकवाड डोंबिवलीपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या खोणी गावात, एका सेवाभावी प्रयत्नातून साकारले