नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक शक्तिशाली लढाऊ विमानांमध्ये एफ ३५ बी स्टेल्थ लाइटनिंग टू लढाऊ विमानाचा समावेश होतो. एका एफ ३५ बी स्टेल्थ लाइटनिंग टू लढाऊ विमानाची किंमत एक हजार कोटी रुपयांच्या घरात जाते. हे विमान ताशी दोन हजार किमी वेगाने आकाशात भरारी मारते. इंग्लंडच्या हवाई दलाच्या ताफ्यात एफ ३५ बी विमानं आहेत. यातलेच एक विमान १४ जून पासून भारतात केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर आहे. तांत्रिक समस्येमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केल्याचे इंग्लंडकडून सांगण्यात आले आहे. या शक्तिशाली विमानात गंभीर बिघाड झाला आहे. या बिघाडावर अद्याप उपाय करणे शक्य झालेले नाही. यामुळे विमान अद्याप तिरुअनंतपुरम विमानतळावर आहे. आता अकरा दिवस झाले तरी परिस्थिती बदललेली नाही.
हायड्रॉलिक फेल्युअरमुळे विमान उड्डाण करू शकत नाही, असे इंग्लंडकडून सांगण्यात आले आहे. तर भारत सरकारने इमर्जन्सी लँडिंग केलेल्या विमानाला पुन्हा उडवणे शक्य व्हावे यासाठी नियमानुसार आवश्यक ते सर्व सहकार्य करत असल्याचे सांगितले. ब्रिटिश रॉयल नेव्हीचे एफ ३५ बी हे पाचव्या पिढीचे आधुनिक लढाऊ विमान आहे. रडारला चकवून आणि स्वतःचे अस्तित्व लपवत वेगाने आणि प्रभावी हवाई हल्ले करण्यास सक्षम असल्यामुळेच ब्रिटिश रॉयल नेव्ही एफ ३५ बी विमानं वापरते.
आंतरराष्ट्रीय समुद्रात असलेल्या इंग्लंडच्या जहाजावरुन ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या एफ ३५ बी लढाऊ विमानाने सरावासाठी उड्डाण केले होते. या विमानात बिघाड झाल्यामुळे ते भारतात उतरवल्याचे इंग्लंडकडून सांगितले जात आहे. विमानातील बिघाडामुळे हे विमान उतरल्यापासून अद्याप उडू शकलेले नाही. विमानाच्या दुरुस्तीसाठी इंग्लंडमधून तंत्रज्ञांचे पथक आले आहे. त्यांचे प्रयत्न सुरू आहेत पण अद्याप विमान दुरुस्त झालेले नाही. तांत्रिक समस्या गंभीर असल्यास विमानाचे भाग सुटे करुन नंतर ते विमान मालवाहक विमानातून इंग्लंडला रवाना केले जाण्याची शक्यता आहे. जर ही शक्यता प्रत्यक्षात आली तर ती इंग्लंडसाठी नाचक्कीची बाब असेल.