
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.
पृथ्वीची कक्षा ओलांडली
अंतराळयानाने ७००० किलोमीटर वेगाने पृथ्वीची कक्षा ओलांडली. आता यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने वेगाने प्रवास करत आहे.
ऐतिहासिक महत्त्व
केनेडी स्पेस सेंटरमधील लाँच पॅड ३९ हे नासाच्या सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक प्रक्षेपण स्थळांपैकी एक आहे. याच ठिकाणाहून नील आर्मस्ट्राँग आणि त्यांचे साथीदार १९६९ मध्ये चंद्रावर गेले होते. आता याच प्रक्षेपण स्थळावरुन अॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात करणार ६० प्रयोग
अॅक्सिओम-४ मोहिमेला घेऊन जाणारे ड्रॅगन अंतराळयान गुरुवार, २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर १४ दिवसांत ६० प्रयोग करणार आहे. प्रयोगांद्वारे वैज्ञानिक संशोधन केले जाणार आहे. पृथ्वीपासून कमी अंतरावरील कक्षेतले गुरुत्वाकर्षण या विषयाशी संबंधित संशोधन प्रामुख्याने केले जाणार आहे.
- शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर असतील. तसेच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर असतील.
- युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) प्रकल्पातील अंतराळवीर स्लावोज उझ्नान्स्की हे १९७८ नंतर अंतराळात जाणारे दुसरे पोलिश अंतराळवीर असतील.
- टिबोर कापू हे १९८० नंतर अंतराळात जाणारे दुसरे हंगेरियन अंतराळवीर असतील.
- पेगी व्हिटसन तिच्या दुसऱ्या व्यावसायिक मानवी अंतराळ मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत. अमेरिकन अंतराळवीराने अंतराळात घालवलेला सर्वाधिक काळ हा तिचा सध्याचा विक्रम आहे.