Friday, October 24, 2025
Happy Diwali

काय सांगता ? २३ वर्षांची जान्हवी डांगेती करणार अंतराळ प्रवास

काय सांगता ? २३ वर्षांची जान्हवी डांगेती करणार अंतराळ प्रवास
नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमधील जान्हवी डांगेती ही २३ वर्षांची तरुणी टायटन्स स्पेसच्या अ‍ॅस्ट्रॉनॉट कँडिडेट मोहिमेंतर्गत अंतराळात प्रवास करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर असलेल्या जान्हवीची टायटन्स स्पेस ऑर्बिटल फ्लाइटमध्ये प्रवास करण्यासाठी निवड झाली आहे. हा प्रवास पाच तास चालेल. निवड झाल्याचे जाहीर होताच जान्हवीने एक इन्स्टा पोस्ट करुन कृतज्ञता व्यक्त केली. जान्हवीने इंस्टाग्रामवर लिहिले की ही निवड झाल्यामुळे तिला खूप सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. मोहिमेसाठीचा तिचा उत्साह एकदम वाढला आहे. टायटन्स स्पेस ऑर्बिटल फ्लाइटचा पहिला प्रवास २०२९ मध्ये होणार आहे. यात तीन तास शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव मिळेल. या मोहिमेद्वारे अंतराळ क्षेत्रातील संशोधनात तरुणांना अधिकाधिक प्रमाणात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जान्हवीच्या मते हा प्रवास संशोधन आणि मानवी अंतराळ उड्डाण प्रगतीसाठी प्रेरणादायी असा मैलाचा दगड ठरेल, इथून नव्या बदलांना सुरुवात होईल. नियोजनानुसार २०२९ मध्ये होणार असलेल्या अंतराळ प्रवासात अंतराळवीर पृथ्वीभोवती दोनदा प्रदक्षिणा घालतील आणि दोन सूर्योदय आणि दोन सूर्यास्त पाहतील. या मोहिमेचे नेतृत्व नासाचे अनुभवी अंतराळवीर आणि निवृत्त अमेरिकन सैनिक कर्नल विल्यम मॅकआर्थर ज्युनियर करणार आहेत. ते टायटन्स स्पेससाठी मुख्य अंतराळवीर म्हणून काम करतात. जान्हवीचे अंतराळ मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षण होणार आहे. याआधी तिने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या क्षेत्रात भरपूर संशोधन केले आहे. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातही ती कार्यरत आहे. तिने शून्य गुरुत्वाकर्षण, उच्च उंचीवरील मोहिमा, स्पेस सूट ऑपरेशन्स आणि प्लॅनेटरी सिम्युलेशनमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. नासाच्या आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रमासाठी निवड झालेली ती पहिली भारतीय आहे. टायटन्स स्पेसकडून अंतराळ मोहिमेसाठी जान्हवीला २०२६ पासून विशेष प्रशिक्षण दिले जाईल. या विशेष संधीसाठी जान्हवीने टायटन्स स्पेसचे आभार मानले आहेत. एका स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने प्रवास सुरू करत असल्याचे सांगत जान्हवीने आनंद व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा