जिल्ह्याच्या विकासासाठी आत्मविश्वासाला कृतीची जोड देणारा नेता...

अॅड. नकुल पार्सेकर : संस्थापक अध्यक्ष, अटल प्रतिष्ठान


गेल्या तीस वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण हे फारच अस्थिर झालेले आहे. पूर्वी ते अस्थिर नव्हते असे नाही पण आजच्या एवढे नक्कीच नव्हते. व्यक्तिगत राजकीय महत्त्वाकांक्षा, नेहमीच सत्तेच्या परिघात राहण्याचा खटाटोप आणि आपल्या जिल्ह्यावर आपली राजकीय पकड कायम राहावी यासाठीची धडपड अशी अनेक कारणे असू शकतात. अर्थात काँग्रेसच्या काळात महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांनी वर्षानुवर्षे सत्तेवर आपली पकड कायम ठेवली. प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांत जसे काँग्रेसचे एकहाती वर्चस्व होते तोच प्रकार कोकणातही होता मात्र काही प्रमाणात समाजवादाचाही पगडा होता. अशा वेळी १९९० च्या दशकांत कणकवली तालुक्यातील वरवडे गावातील सुपुत्राने शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने हातात सेनेचा भगवा आणि धनुष्यबाण घेऊन प्रवेश केला. मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक व बेस्ट समितीचे चेअरमन आणि बाळासाहेबांचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांचे पिताश्री माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे विद्यमान खासदार नारायणराव राणे यांनी कणकवली- मालवण या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिला सुरुंग लावून विधानसभा जिंकली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. नंतर १९९५ मध्ये युतीचे मंत्री आणि शेवटच्या अवघ्या आठ महिन्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. प्रमोद महाजन या दोन मोठ्या नेत्यांच्या राजकीय रणनीतीमुळे महाराष्ट्रात सेना-भाजपाची आलेली ती पहिली सत्ता.


मा. नारायणराव राणे यांचा हा राजकीय प्रवास सुरू असतानाच राणे यांचे धाकटे सुपुत्र आणि या जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे हे तेव्हा परदेशात लंडनला एम. बी. ए. चे शिक्षण घेत होते. सेना-भाजपाची सत्ता गेली आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आले. तेव्हा नारायणराव हे विरोधी पक्षनेते होते. मातोश्री विशेषतः उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राजकीय मतभेद झाले आणि २००५ मध्ये बाळासाहेबांचे कट्टर व विश्वासू शिवसैनिक नारायणराव राणे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा हात पकडला. काँग्रेसमध्ये आले, मंत्री झाले... आणि याच दरम्यान २००६ मध्ये राणे साहेबांचे कनिष्ठ सुपुत्र लंडनमधील आपले शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतले. काही महिने लोटल्यानंतर नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात युवकांची फळी निर्माण केली. या युवा संघटनेची व्याप्ती वाढली. युवकांची सगळ्यात महत्त्वाची समस्या रोजगार. त्यासाठी महाराष्ट्रातील मोठ्या शहरात रोजगार मेळावे घेऊन रोजगार निर्मितीचा प्रयत्न केला. इकडे दादा काँग्रेसमध्ये मंत्रीपदावर आपल्या पद्धतीने कार्यरत होते, तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे दूरदृष्टीने स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून स्वतःचा राजकीय स्पेस निर्माण करत होते. दादांचे आयुष्य हे शिवसेनेसारख्या आक्रमक शैलीत काम करण्यात गेले. काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून धुसफूस सुरूच होती. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून नितेश राणे यांच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी काँग्रेसकडूनही दबाव येत होता, तरीही नितेश राणे यांनी या दबावाला भीक घातली नाही.


२००९ मध्ये देवगड-कणकवली या पुनर्रचना झालेल्या मतदारसंघातून दादांचे उजवे समजले जाणारे ठाण्याचे नगरसेवक रवींद्र फाटक यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली, जे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास आहेत. या निवडणुकीत फाटक यांचा भाजपाचे प्रमोद जठार यांनी अवघ्या ३४ मतांनी पराभव केला आणि स्व. आप्पासाहेब गोगटे यांचा हा गड नवख्या प्रमोद जठारांनी राखला. खरे म्हणजे जठारांना ही लागलेली लाॅटरीच होती. जठार विरोधी पक्षाचे आमदार झाले.


नारायणराव राणे यांचा मुंबई पोटनिवडणुकीत तसेच कुडाळ मतदारसंघात नवख्या वैभव नाईकांनी दोन वेळा केलेला पराभव तसेच नितेश राणे यांचे ज्येष्ठ बंधू विद्यमान आमदार निलेश राणे यांचा खासदारकीला झालेला पराभव याचे फार मोठे शल्य राणे कुटुंबीयांना होतेच पण जास्त जखमा या नितेश राणे यांना झाल्या होत्या. दादांनी काँग्रेसशी फारकत घेऊन आपला स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला. तांत्रिकदृष्ट्या नितेश राणे काँग्रेसमध्ये होते. नवीन पक्ष काढणे व तो चालवणे या मर्यादा आणि दादांचे वाढते वय यामुळे काही दिवसांतच दादांनी भाजपाचे कमळ हातात घेतले आणि केंद्रात मंत्री झाले. भाजपाने राज्यसभेवर संधी दिली. २०१९ च्या निवडणुकीत कणकवली या आपल्या हक्काच्या मतदारसंघात नितेश राणे भाजपाचे पुन्हा आमदार झाले. त्यांनी त्यांचेच जुने सहकारी सेनेचे सतीश सावंत यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.


केंद्रात दादा मंत्री आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार अडीच वर्षे मातोश्री आणि राणे कुटुंबीय हा संघर्ष अवघ्या महाराष्ट्राने पाहिला व अनुभवला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीकाटिप्पणी केल्यामुळे केंद्रीय मंत्री दादांना जेव्हा अटक झाली तेव्हा मीडियाला प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे यांच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंची सगळी उत्तरं त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यावर दिली. तेव्हा ते म्हणाले होते, हे दृश्य मला सहन होत नव्हते पण मी संयमाने ही घटना माझ्या हृदयात एका विशेष कप्प्यात सेव करून ठेवली आहे. योग्य वेळी हा कप्पा मी उघडणार आहे. मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी केलेले हे वक्तव्य आणि त्याचे राजकीय पडसाद आपण नंतर अनुभवले.


सहा महिन्यांपूर्वी नितेश राणे यांची महाराष्ट्र राज्याचे मस्य व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून निवड झाली. ते शपथ घेत असताना मला १९९५ चा सेना-भाजपा मंत्रिमंडळाचा मुंबई येथील स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. प्रमोद महाजन अशा नेत्यांच्या उपस्थितीत झालेला शपथविधी आणि त्या सेना-भाजपाच्या पहिल्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून शपथ घेतानाचे दादा आठवले. तोच आवेश, तोच आत्मविश्वास आणि तोच कोकणी बाणा... जो नागपूर येथे २०२४ मध्ये नारायणराव यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी शपथ घेताना जाणवला.


गेली सुमारे चार वर्षे नितेश राणे यांनी आक्रमक हिंदुत्ववाची हार्डलाइन का स्वीकारली? हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही हार्डलाईन योग्य आहे का? ❓यामुळे भविष्यात याचा राजकीय तोटा तर नितेश राणे यांना होणार नाही ना? अशी सार्वत्रिक चर्चा सुरू आहे. मग याचा विचार नितेश राणे यांनी केला नसेल का? ❓अल्पसंख्याकांबाबत केलेल्या एका वक्तव्याबाबत त्यांच्याच मतदारसंघातील एका अल्पसंख्याक मित्राने मला प्रत्यक्ष भेटून सांगितले की, “आम्ही, नितेश राणे यांचे फॅन आहोत. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आमच्या त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत आणि विश्वास पण आहे मात्र आमच्या समाजाबाबत ते ज्या पद्धतीने व्यक्त होतात त्याबद्दल आमचे समाजबांधव नाराज आहेत”


अर्थात जो अल्पसंख्याक युवक मनापासून प्रेम करतो त्याच्या भावनांचा विचार नितेश राणे यांनी करावा ही माझी त्यांना व्यक्तिगत विनंती. आपला धर्म, भारतीय संस्कृती, परंपरा याचा प्रत्येक भारतीयांना निश्चितच अभिमान आहे आणि तो असला पाहिजे. त्यांच्या हिंदुत्वाच्या या हार्डलाइनमुळे भविष्यात त्याचे नेमके त्यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होतील हे येणारा काळ ठरवेल. अर्थात ते समजण्याएवढे ते निश्चितच परिपक्व आहेत.


जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या एका वेगळ्या शैलीत काम सुरू केले आहे ते पाहता जिल्ह्यात भविष्यात काहीतरी आश्वासक घडेल असा विश्वास या सिंधुदुर्गातील जनतेला वाटत आहे. कुणीही सत्तेवर असला तरी शंभर टक्के समस्यांचे निराकरण व अपेक्षापूर्ती होत नाही. पण पहिल्याच नियोजनाच्या बैठकीत तब्बल चारशे कोटींची केलेली तरतूद असेल. गावपातळीवर छोट्या-मोठ्या समस्या निवारण करण्यासाठी तातडीने घेतलेले निर्णय असतील, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्यासाठीचा आग्रह असेल, समाजातील सर्व घटकांशी साधत असलेला सुसंवाद असेल, केंद्रीय स्तरावर काही मंत्रालयीन पातळीवर त्यांच्या मंत्रालयाशी निगडित प्रलंबित प्रश्नांसाठी ते सातत्याने करत असलेले प्रयत्न असतील, हे गेल्या सहा महिन्यांतील माझे निरीक्षण पाहता नितेश राणे यांच्याकडून एक सकारात्मक अपेक्षा करायला हरकत नाही. अर्थात त्यांच्या अवघ्या सहा महिन्यांच्या कार्यकाळाचे मूल्यांकन करणे जरा घाईचे होईल पण ‘बापसे बेटा सवाई’ याची प्रचिती येते आहे हे निश्चित.
आपला आज वाढदिवस. कमी वयात आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि आपले अनुभवी व कार्यकुशल प्रशासक पिताश्री आणि आमचे सर्वांचे लाडके दादा यांच्या पुण्याईमुळे आपणास संधी मिळालेली आहे. आपला एक मित्र म्हणून मला विश्वास आहे की, आपण या संधीचे सोने करून आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एका वेगळ्या उंचीवर न्याल यासाठी आपणास मनापासून शुभेच्छा!

Comments
Add Comment

कोकणात निवडणुकीची मोर्चेबांधणी...!

कोकणातील चारही जिल्ह्यांचा विचार करताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदेगट या दोन पक्षांचे प्राबल्य आहे.

नितीन गडकरींनीच केली डॉ. जिचकारांची कदर

नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाचे

जातीपातीच्या लढ्यात मराठवाडा भरकटतोय!

जातीपातीचे राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील जुने सत्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून राजकीय पक्षांनी

मोहन भागवत : राष्ट्रनिर्माणाचा मार्गदर्शक

माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कैलासवासी मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला

नवीन प्रभाग रचना ठरणार भाजपसाठी ‘गेमचेंजर’

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना भाजपने आपल्या सोयीचीच ठेवल्याचा आरोप झाला. त्यातच

सातारा गॅझेट : दक्षिण महाराष्ट्राच्या अपेक्षा उंचावल्या

पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये ज्येष्ठ नेते नारायण राणे समितीच्या अहवालाने मिळालेल्या मराठा आरक्षणाचा फायदा