Friday, October 24, 2025
Happy Diwali

खात्याची प्रतिष्ठा वाढवणारे मंत्री नितेश राणे

खात्याची प्रतिष्ठा वाढवणारे मंत्री नितेश राणे

संतोष राऊळ कणकवली

मंत्रीपदाच्या काळात खाते कोणतेही असू दे त्या खात्याला प्रतिष्ठा मिळवून द्यायची, त्या खात्यात जे आजपर्यंत काम झाले नाही, ते करायचे ही राणे पिता-पुत्रांची कार्यपद्धती आहे. जसे की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे सुरुवातीला मंत्री झाले त्यावेळी मत्स्य, दुग्धविकास अशा मंत्रीपदांना न्याय देत मुख्यमंत्री पदापर्यंत आपला ठसा उमटवला. आता त्यांचे सुपुत्र मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत मंत्री म्हणून काम करत आहेत. आपल्या खात्याची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीतून मत्स्य आणि बंदरे खात्याची प्रतिष्ठा वाढत आहे. गेले कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या मत्स्य व बंदरे विकासाला एक नवा आयाम मंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मिळू लागला आहे.

मत्स्य आणि बंदरे विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नामदार नितेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयात मत्स्य विभागाचे स्वतंत्र असे कार्यालय उभे केले. ज्यामुळे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून प्रत्येकाला एक ऊर्जा प्राप्त होते असे सुसज्ज कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सुरू केले आणि राणे म्हणजे वेगळेपण, राणे यांची काम करण्याची शैली अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. मंत्री नितेश राणे हे मुळातच हुशार व्यक्तिमत्त्व आहे. अभ्यासू आहेत. आजपर्यंत आपल्या खात्यात काय करता येईल आणि काय झाले नाही याचा त्यांनी पहिल्यांदा अभ्यास केला. मत्स्य विकासात प्रगती करायची झाली, तर मच्छीमारांना कोणते फायदे दिले पाहिजेत, कशा पद्धतीने मच्छीमारांना पुढे घेऊन गेले पाहिजे. याचा अभ्यास केला आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे मच्छीमार हा दुर्लक्षित होता, त्याला विकासाच्या प्रवासात आणले. मच्छीमार बांधवांना सुरक्षा देताना त्याच्यावरची आक्रमणे कमी केली. एलईडी मासेमारी, परप्रांतीय मच्छीमारांची आक्रमणे बंद केली. गोड्या पाण्यातील मासेमारीला चालना दिली आणि तिसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण मच्छीमार समाजाला ते करत असलेल्या मत्स्य व्यवसायाला ‘कृषीचा दर्जा’ दिला. म्हणजेच शेतकऱ्यांप्रमाणे त्यांची मासेमारी ही देखील एक प्रमुख अन्न आहे आणि तो घटक शेतीप्रमाणेच जनतेच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा पद्धतीची विधानसभेत, विधान परिषदेत आणि कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणी करून तसा अध्यादेश काढण्यात मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळवून देणारे नितेश राणे हे सर्वात यशस्वी मंत्री ठरले !

तर बंदरे विकासासाठी केंद्र सरकारबरोबर त्यांचा असलेला पाठपुरावा आणि योजनांची अंमलबजावणी यात सर्वाधिक आघाडीवर नितेश राणेच आहेत. या बंदरातून नवनवीन पद्धतीने वाहतुकीची व्यवस्था सुरू करण्याचा मानस मंत्री नितेश राणे यांनी ठेवला आहे आणि त्यासाठी ते कामाला लागले आहेत. मुंबई शहरातील उपनगरातील वाहतुकीवरील वाढणारा बोजा कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी ते जलवाहतुकीचा पर्याय निवडत आहेत. म्हणजेच काही लोक रेल्वे, लोकल बस यांचा वापर करतात. तसेच ते जलवाहतुकीचाही वापर करून आपल्या घरी जाऊ शकतात. यातून मुंबईकरांचे जीवन अधिक सुलभ व गतिमान व्हावे, यासाठी मुंबईत ‘वॉटर मेट्रो’ ही संकल्पना मंत्री नितेश राणे अमलात आणत आहेत. एवढेच नाही, तर कोकणापर्यंत म्हणजेच थेट वेंगुर्ला, मालवणपर्यंत प्रवासी बोट सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या गणेश चतुर्थीपासून ती सुरुवात होईल अशा पद्धतीने त्यांचे झपाट्याने काम सुरू आहे.

मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून मत्स्य व बंदरे विकास या खात्यांना प्रक्रियेत आणून गेल्या शंभर दिवसांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रोग्रॅममध्ये पहिल्या पाचमध्ये मंत्री नितेश राणे यांनी आपले स्थान निर्माण केले. खात्याचा पारदर्शक कारभारही मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. एवढेच नाही तर गेल्या तीन-चार महिन्यांत मत्स्य विभागाकडूनही राज्याच्या उत्पन्नात वाढ केली. या त्यांच्या कामाच्या पद्धतीतून खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासारखी नेते मंडळी निश्चितच समाधानी झाली आहेत आणि त्यांच्याकडून तशा पद्धतीचे सर्टिफिकेट्स त्यांना वारंवार मिळालेले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकत्व मंत्री नितेश राणे यांनी आमदार असल्यापासूनच स्वीकारले आहे. त्यातच ते मंत्री झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींना प्राधान्य दिले आणि यामध्ये विकासाचे महत्त्वाचे टप्पे, पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गचा विकास कसा होईल आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर त्यांनी भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरवला आहे. पहिलाच एआय प्रणाली वापरणारा सिंधुदुर्ग जिल्हा अशी ओळख आज राज्यात आणि देशात निर्माण केली आहे. याचे संपूर्ण श्रेय मंत्री नितेश राणे यांना जाते. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांनी या प्रणालीचा विचारही केला नाही. अशा वेळी नितेश राणे ही प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करून एक नवा आदर्श घालून देतात. त्यांच्या दुरदृष्टीला सलाम... कारण पुढच्या दहा वर्षांत आपण कुठे असू हे पाहायचे असेल, तर आज नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारले पाहिजे ही त्यांची विचारधारा. जगाबरोबर प्रगती करायची असेल, तर तेवढ्याच झपाट्याने आपण पुढे चालले पाहिजे अशी त्यांची भावना आणि त्यामुळेच कोणत्याही अडचणींना कायद्याच्या चौकटीत खोळंबून न ठेवता त्यावर पर्याय काढण्यात मंत्री नितेश राणे हे यशस्वी झालेले दिसतात.

झी गौरव पुरस्काराचा कार्यक्रमही ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणत आहेत. यामागे त्यांना आपल्या जिल्ह्याची ओळख जग आणि देशपातळीवर निर्माण करायची आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित जिल्हा करायचा झाल्यास दळणवळणाची साधने मजबूत असली पाहिजेत हा विचार घेऊन चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न त्यांनी सोडवला. जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख निधी दिला. त्यामुळे चिपी विमानतळाचा विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निकाली निघाला आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांचे काम प्रभावीपणे जनतेच्या मनात बिंबवले आहे. जिल्ह्याचा चेहरा सुसंस्कृत बनवण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यासाठीच त्यांनी गांजा-चरस असे अमली पदार्थ यापासून नव्या पिढीला दूर ठेवता यावे म्हणून कडक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे अनेक अनधिकृत गोष्टींना आळा बसला. जनतेच्या जीवनावश्यक सेवांसाठी ते नेहमीच आग्रही असतात. नागरिकांना वीज, पाणी, दळणवळणाची साधने त्याचप्रमाणे सर्व सुविधा अशा सर्वांगीण सेवेसाठी प्रशासक म्हणून पालकमंत्री या नात्याने प्रशासन यंत्रणा पळविण्याचे काम ते यशस्वीपणे करताहेत. अशा या मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

Comments
Add Comment