Friday, October 24, 2025
Happy Diwali

उत्तुंग विचार आणि व्हिजन असलेले नेतृत्व

उत्तुंग विचार आणि व्हिजन असलेले नेतृत्व

त्यादिवशी प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर यांचा फोन आला. मला वाटलं आज तो जरा निवांत असावा. म्हणून फोन केला असेल. आम्ही एका कॉलेजचे विद्यार्थी असल्याने अरे, तुरे... असो. तर फोन करण्याचं कारण होतं ना. नितेश राणे पालकमंत्री सिंधुदुर्ग आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री यांच्याबाबत माझे मनोगत लिहून पाहिजे. माझ्या तोंडून ‘बापरे’ आलं. प्रामाणिकपणे सांगते. कारण मला कम्माल वाटते, त्यांच्या कार्यप्रणालीबाबत... एवढ्या लहान वयात निवडणुका लढविणं एकवेळ सोपं, पण मतदारसंघावर प्रभुत्व मिळवणं सोपं नाहीच. माजी केंद्रीय मंत्री नारायणराव (दादा) राणे यांचाही एक ठसा या मतदारसंघावर आहे. नितेश राणे यांच्या मागे ते एक वलय होतं, आहे.

जनतेचे प्रश्न, त्यांच्या समस्या, मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या मागण्या, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, मतदारसंघातील वेगवेगळ्या खात्यांची, खात्यांमधील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून ती शिघ्रगतीने प्राधान्यक्रमाने हाती घेणे, तशी आर्थिक तरतूद करणे, त्या कामांची पूर्तता करून कार्यकर्त्याला, मतदाराला खूश ठेवणे, सोप्पे काम नाही आणि मला त्यांच्याबद्दल आदर निर्माण व्हावा त्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणा, सद्गुण म्हणा ‘‘दिलेला शब्द पाळणे’’ माझ्या लेखी उत्तम व्यक्तिमत्त्वाचा तो एक भाग आहे. पैलू आहे. कारण एखाद्याला दिलेला ‘शब्द, वेळ आणि विश्वास’ ज्याच्या ठायी आहेत तो जिथे उभा असेल तिथे हिऱ्यासारखा अंधारातही चमकणार. तसं हे व्यक्तिमत्त्व आहे आणि हे मी मला आलेल्या त्यांच्याबाबतच्या अनुभवावरून सांगते.

मी स्वत: राजकारणात आले ती संधी मिळाल्यामुळे आले, पण पदांची, खुर्च्यांची स्वप्न अशी नव्हती माझ्यापाशी फक्त ‘विकास’ हेच स्वप्न होते आणि आहे. ईश्वर कृपेने ‘विकास’ करताना अडथळे जरूर आले, पण मार्गही सापडले. प्रत्येक अडथळ्यानंतर तत्कालीन असलेले नेते आणि अधिकारीसुद्धा देवासारखे भेटले. तसंच आजच्या घडीला नितेश राणे मला ईश्वरसारखे भासतात. हे मी मनापासून सांगते.

मी माझा एक अनुभव सांगेन. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाले तर नितेश राणेंबद्दल श्रद्धा, कौतुक दोन्ही मला वाटू लागलंय. एक अनुभव असा, प्रहारच्या कार्यालयात एक प्रमुख कार्यकर्त्यांची सभा लावण्यात आली होती. १४ जून २०२२ रोजी. त्यावेळी अनेक वर्षे मला भेडसावणाऱ्या माझं माहेर असणाऱ्या देवगड तालुक्यातील जामसंडेमधील भिडे-भटवाडी ते राममंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यासंबंधीचा प्रश्न. मला सारखं वाटायचं मी कुणाला, कोणत्या नेत्याला सांगितलं तर हे काम होऊ शकेल? आणि जशी परमेश्वराकडे प्रार्थना करावी, तशी बसल्याजागीच जामसंडे भिडे भटवाडी ते राममंदिर रस्ता एकमार्गी पुलासह व्हावा असं निवेदन तयार केलं आणि सभा आटोपताच साहेबांना भेटले. माझ्या नशिबाने क्षणभर ना. नितेश राणे निवांत असताना त्यांच्याकडे निवेदन सुपुर्द केलं. निवेदन पाहताच नितेश राणे म्हणाले, आपण पहिल्यांदा मला कामासाठीचे निवेदन दिले आहे. नक्की होणार मा. शेलारजींना लागलीच तसे सांगितलेही. त्या क्षणाला पूल, रस्ता झाल्यानंतर होणाऱ्या आनंदापेक्षा आनंद झाला. पण हे काम स्थानिक निधीमधून होऊ शकणार नाही असे सांगितले. संबंधित खात्याने म्हणून नितेश राणेंना १७ मार्च २०२३ रोजी तसे निवेदन दिल्यानंतर नगरविकास विभागामार्फत १ कोटी ८ लाख एवढा निधी, जामसंडे भिडे-भटवाडी ते राममंदिर या पुलाकरिता उपलब्ध करून दिला.

कित्येक वर्ष या रस्त्याबाबत मी अस्वस्थ होते. ते म्हणतात, चुटकीसरसी मार्गी लागत आहे. का नाही बसणार श्रद्धा अशा नेत्यावर !! माझ्या सामाजिक कार्य प्रवासाच्या उत्तरार्धात समाधान... समाधान आणि काय असणार? कारण मी अंथरुणावर पडते तेव्हा, शांत डोळे मिटून बसते तेव्हा मी फक्त आणि फक्त ‘‘विकासाचा’’ विचार करते. आणि जेव्हा केव्हा मला एखादी विकासकामाबाबत समस्या उद्भवते तेव्हा देवाशपथ सांगते. नितेश राणे समोर दिसतात आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मेसेजला सेकंदाचाही विलंब न लावता मला दिलासा देणारा मोजक्या शब्दातला मेसेज ‘‘मी करतो, Dont Worry’’ आणि वेगळा परमेश्वर कुठे असतो? मंदिरात? अजिबात नाही... तो तुमच्या मनात आणि हृदयात असावा लागतो. परमेश्वर लहान-मोठा जसा नसतो तसेच नितेश राणे वयाने लहान आहेत, पण त्यांचा मतदारसंघ आणि मतदारसंघाबाहेरचा अभ्यास दांडगा जनसंपर्क आणि अनेकानेक विषय, प्रश्न, अडचणी, कार्यकर्त्यांचे प्रश्न, सातत्याने असणाऱ्या सभा, स्वत: समोर असलेले विकासाबद्दलचे व्हिजन हे सारं डोक्यात असूनही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीने मेसेजद्वारा पाठविलेला एखादा विषय. त्याबाबत भेटताक्षणी बोलणे... हे सारं कौतुकास्पद. नाहीतरी भक्तांच्या काय वेगळ्या मागण्या असतात परमेश्वराकडे... माझ्यासारख्या भक्ताची हीच मागणी असेल म्हणून मला नितेश राणे परमेश्वरा समान वाटतात. श्रीराम त्यांना उदंड आयुष्य. त्यांच्या कार्यात यश, इच्छाशक्ती, उदंड मनोबळ, उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना !!

Comments
Add Comment