मी नितेश निलम नारायण राणे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...

  336

डॉ. सुकृत खांडेकर


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे राजभवनावर शपथविधी झाला आणि सिंधुदुर्गमधून सलग तिसऱ्यांदा तब्बल ५८ हजारांचे मताधिक्य घेऊन निवडून आलेले नितेश राणे यांचा कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश झाला. मी नितेश निलम नारायण राणे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, असे त्यांनी वाक्य उच्चारले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जल्लोष सुरू झाला. एवढेच नव्हे तर राज्यातील हिंदुत्ववादी तरुणाईंमध्ये आनंदाची लाट पसरली. अडीच-तीन वर्षे हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून प्रतिमा निर्माण झालेल्या नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, ही त्यांच्या सार्वजनिक कामाची पोहोचपावती म्हणावी लागेल. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कामांची दखल घेतली. त्यांची कार्यकुशलता आणि पक्षासाठी केलेली कामगिरी लक्षात घेऊन पक्षाने त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर वृत्तवाहिन्यांच्या, वार्ताहरांचा त्यांच्याभोवती बाहेर गराडा पडला. त्यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले - हिंदुत्वाचे विचार आणखी मजबूत करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील व मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी आपण मंत्रीपदाचा उपयोग करणार...


दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी ३९ मंत्र्यांचा नागपुरात शपथविधी झाला. नवीन सरकारमध्ये वीस नवीन चेहरे मंत्री झाले. त्यात भाजपाचे नऊ जण आहेत. त्यातला पहिला नंबर नितेश राणे यांचा आहे. मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामातून गेल्या सहा महिन्यांत खात्यावर विलक्षण पकड निर्माण केली. मच्छीमारांचे हित आणि सागर किनारा सुरक्षा हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. आजवर मत्स्य व्यवसाय व बंदरे हे खाते कुणाकडे होते हे जनतेला ठाऊक नसायचे, या खात्याच्या कारभारावर कधी चर्चा होत नसे, पण या खात्याला घराघरांपर्यंत पोहोचविण्याचे काम नितेश राणे मंत्री म्हणून करीत आहेत. आता आपली काळजी घेणारा, आपला माणूस मंत्री झाला, अशी भावना मच्छीमार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये निर्माण झाली आहे.


नितेश राणे यांचा उत्साह जबरदस्त आहे. ते सदैव कार्यरत असतात. मुंबई, कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रभर पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा हिंदू सकल मोर्चाच्या निमित्ताने त्यांची सर्वत्र भ्रमंती चालू असते. त्यांचे दौरे व त्यांच्याकडे असलेली ऊर्जा खरोखरच अचंबित करणारी आहे.


मुंबईत किंवा कोकणात कुठेही असले तरी त्यांच्याभोवती गर्दीचा विळखा दिसतो. लोकांच्या समस्या त्यांच्या समोरच सोडविण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनाही ते सहज उपलब्ध असतात. विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्याकडून सडेतोड उत्तर मिळणार, याची पत्रकारांना खात्री असते.



नितेश यांच्याकडे त्यांच्या आवडीचे व कोकणात भरपूर काम करता येईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदरे या खात्याचा कारभार आहे. या खात्यासाठी काम करताना मच्छीमारांच्या हितासाठी, मत्स्योत्पादन वाढीसाठी, सागर किनारा सुरक्षेसाठी त्यांनी अक्षरश: वाहून घेतले आहे, पण त्याचबरोबर आपला हिंदुत्वाचा अजेंडा कायम ठेवला आहे.


नितेश राणे हे अघळपघळ कधीच बोलत नाहीत. आपल्या स्पष्ट व अचूक बोलण्याने कुणाला काय वाटेल, याचा ते कधीच विचार करत नाहीत. पक्षाची भूमिका मांडताना ते कोणाची पर्वा करत नाहीत. त्याचे बोलणे नेहमीच धारदार असते. विरोधकांच्या वर्मावर घाव घालणारे असते. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेकदा वाद निर्माण होतात. त्यांचे वक्तव्य विरोधकांना झोंबणारे असते. इकोफ्रेंडली दिवाळी-होळी साजरी होऊ शकते, मग ईद का नाही, असा त्यांनी प्रश्न विचारला, तर भाजपा विरोधकांना पोटदुखी का व्हावी? खरे तर अल्पसंख्य समाजातील सुशिक्षित व पुरोगामी नेत्यांनी स्वत: पुढाकार घेऊन नितेश राणेंचा विचार पुढे मांडला पाहिजे. जेव्हा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, असे हिंदू समाजाला आवाहन केले जाते.


तेव्हा हिंदू समाज समजून घेतो, दुसऱ्या धर्माला नावे ठेवत नाही, हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही, तसा विचार अल्पसंख्याकांनी करावा असा सल्ला नितेश राणे यांनी दिला, तर त्यात गैर काय? इकोफ्रेंडली बकरी ईद, ही नितेश राणे यांची सूचना आज ना उद्या विज्ञान-तंत्रज्ञान युगात रूढ करावी लागेल.


भाजपामध्ये पक्षाने जी जबाबदारी दिली ती निष्ठेने पार पाडण्याचे काम नितेश राणे करीत असतात. तसेच भाजपाने एकदा काम त्यांच्यावर सोपवले की त्याचे शंभर टक्के रिझल्ट देतात. उबाठा सेनेचे खासदार असलेले प्रवक्ते रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका करीत असतात. सतत मोदी-शहांचा राजीनामा मागत असतात. एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षालाही ते सतत कमी लेखत असतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची टीका बोथट झाली. त्याचे सर्व श्रेय नितेश राणे यांच्या सडतोड कामगिरीला द्यावे लागेल. मातोश्री व उबाठा सेनेचे प्रवक्ते यांना तत्काळ उत्तर देण्याची जबाबदारी पक्षाने नितेश राणेंवर सोपवली.


उबाठा सेनेची सकाळची पत्रकार परिषद संपली की, लगेचच संजय राजाराम राऊत अशी सुरुवात करून नितेश राणे यांच्या तोफा धडाडू लागतात. विशेषत: लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी नितेश राणे यांनी उबाठा सेनेवर केलेले हल्ले व प्रतिहल्ले त्याला तोड नव्हती. पक्षातील अन्य कुणालाही जे सहज जमले नसते, ते नितेश यांनी करून दाखवले.


नितेश राणे यांच्या हल्ल्याने उबाठा सेना व काँग्रेस हे दोन पक्ष रक्तबंबाळ होतात, किंवा हतबल होतात, असे अनेकदा दिसले. राज्याचे मंत्री असे कसे बोलू शकतात, मंत्रीपदाचे त्यांनी भान ठेवले पाहिजे, असा कल्लोळ विरोधी पक्षाचे नेते करतात. नितेश राणे जे बोलले, त्याचे ते खंडन करू शकले नाहीत. नितेश यांच्या वक्तव्याचा त्यांना प्रतिवाद करता येत नाही. वादाचे प्रसंग उद्भवल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नितेश राणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात, हेच महाराष्ट्राला वेळोवेळी दिसले आहे. भाजपा हा राज्यात व केंद्रात सर्वात मोठा पक्ष आहे, भाजपा इतरांपेक्षा बलवान आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च शक्तिशाली नेते आहेत, असे नितेश राणे विरोधकांना वारंवार सुनावतात. जे वास्तव आहे, तेच ते सांगत असतात. पण त्यांच्या बोलण्याने विरोधी पक्षाला मिरच्या झोंबतात. अंगावर भगवी शाल पांघरून, कपाळावर गंध लावून नितेश राणे जेव्हा हिंदू सकल मोर्चाचे नेतृत्व करायला जातात, तेव्हा हजारोंच्या संख्येने तरुणाई त्यांच्यासाठी बेभान होते, असे दृष्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसून आले. हिंदुत्वाचा चेहरा म्हणून त्यांनी तरुण वर्गाचा मोठा विश्वास संपादन केला आहे. त्यांचे बेधडक व बिनधास्त बोलणे हे तरुणांना खूप पसंत आहे हेच दिसून येते.


मंत्री आणि पालकमंत्री अशा दोन्ही भूमिका ते प्रभावीपणे बजावताना दिसतात. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया रेडिओ क्लबजवळ सुसज्ज जेटी उभारण्याच्या प्रकल्पाला त्यांनी गती दिली आहे, रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरावरील वर्षानुवर्षे असलेली अतिक्रमणे हटवून त्याचा चेहरा-मोहरा एका दिवसात बदलला, प्रार्थनास्थळांवरील लाऊडस्पीकर्सचे आवाज कमी झाले, सागरी सुरक्षतेसाठी व अनधिकृत मासेमारीवर निर्बंध घालण्यासाठी रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात ड्रोन प्रणाली कार्यान्वित होणार आहे, किनारपट्टी विकासाबरोबर सागरी सुरक्षितेला प्राधान्य देण्यासाठी एकाच वेळी ७ जिल्ह्यांतील ९ समुद्र किनाऱ्यांवर ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे, व़ॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार असून गेट-वे ते जेएनपीटी धावणार आहे, शिवाय जल वाहतुकीमुळे माझगाव ते मालवण पाच तासांत पोहोचता येईल, मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा क्रांतिकारी निर्णयही त्यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारने घेतला.


गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याने चमत्कार घडवला. माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी - सिंदुधुर्ग जिल्ह्यातील जनतेने लोकसभेवर खासदार म्हणून निवडून दिले. निलेश व नितेश या बंधूंना विधानसभेत निवडून दिले. नारायण राणे यांच्या विजयाने सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे कमळ प्रथमच फुलले. निलेश शिवसेनेतून (एकनाथ शिंदे), तर नितेश भाजपातून आमदार झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणे परिवारावर शंभर टक्के विश्वास दर्शवला. राणे परिवाराचा कोकणात घरोघरी असलेला जनसंपर्क व सार्वजनिक काम तसेच कर्यकर्त्यांची फळी ही मोठी जमेची बाजू आहे. राणे कुटुंबाला राजकारणातून संपविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलीस - प्रशासनाची ताकद वापरून राणे परिवाराला हैराण करण्याचा प्रयत्न झाला. पण राणे परिवार मागे हटला नाहीच, उलट या सर्वांची लोकप्रियता इतरांपेक्षा जिल्ह्यात खूप मोठी आहे, हेच लोकसभा व विधानसभा निवडणूक निकालाने सिद्ध करून दाखवले.


नितेश राणे हे वेळेचे भान असलेले नेते आहेत. त्यांना स्वच्छता व नीटनेटकेपणा आवडतो. त्यांचे कपडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे उत्तम असतात. त्यांना गबाळेपणा मुळीच आवडत नाही. कामात गुणवत्ता, दर्जेदारपणा व अचूकता असली पाहिजे व काम वेळेत झाले पाहिजे याविषयी ते दक्ष असतात. आई - वडिलांवर त्यांची अपार श्रद्धा आहे. भावाविषयी प्रेम व जिव्हाळा आहे. पक्षाच्या विचारसरणीवर कडवट निष्ठा आहे. वडिलांचे मार्गदर्शन, आईचे आशीर्वाद, भावाची साथ, विश्वासू कार्यकर्त्यांची फौज आणि देवाभाऊंचे भक्कम पाठबळ असा नितेश राणेंकडे मोठा खजिना आहे. मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने उदंड शुभेच्छा...


sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Comments

Revati Krishna Alave    June 23, 2025 04:03 AM

Excellent 👍

Add Comment

विदर्भात भाजपने फुंकले निवडणुकांचे रणशिंग

सेवाग्रामला झालेल्या या एकदिवसीय मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच मार्गदर्शन केले.

मराठवाड्यात भूमाफियांचा उच्छाद

मराठवाड्यात संपत्तीच्या खरेदी-विक्रीच्या प्रकरणात अनेक उलाढाली होतात. राज्याचे मंत्री यांच्याविषयी हॉटेल

भाजपमध्ये इनकमिंग जोरात; पण प्रकल्प अपूर्णच

नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत

भाजपची पुढची तयारी

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पुण्यातील राजकारणावर काँग्रेस पक्षाचा ठसा होता. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या

पाचपट मोबदल्याने ‘शक्तिपीठ’ मार्गी लागणार!

विशेष प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ

एक हजार आदिवासी विवाहबंधनात...!

संतोष वायंगणकर कोकणातील रायगड जिल्ह्यात आजही आदिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. रायगड जिल्ह्यातील आदिवासी