Friday, October 24, 2025
Happy Diwali

जहाल आणि जाज्वल्य

जहाल आणि जाज्वल्य

प्रकाश जनार्दन गोगटे देवगड

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, जहाल आणि जाज्वल्य हिंदुत्ववादी आणि देवगड - कणकवली मतदारसंघाचे लाडके आमदार, नामदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस. नितेश यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

सुमारे १५ वर्षांपूर्वी प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून नितेश राणे देवगड - कणकवली मतदारसंघाचे अतिशय लहान वयात आमदार झाले. आमचा भारतीय जनता पक्ष हा त्यांचा विरोधक म्हणून काम करीत होता. याच काळात देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत आमचे भारतीय जनता पक्षाचे १७ पैकी फक्त ४ उमेदवार निवडून आले आणि पहिलीच नगरपंचायत त्यांनी जिंकली. त्यानंतरच्या अनेक ग्रामपंचायतीपासून लहान लहान निवडणुकांमध्ये नितेश राणे यांनी आमच्या भारतीय जनता पक्षाला बऱ्याच ठिकाणी हार चाखायला लावली. या काळात पक्षीय वातावरण बरेच बिघडले होते. मात्र माझ्याशी नितेश यांनी खूप चांगले संबंध निर्माण केले होते. पक्षीय मतभेद जरी असले तरी स्व. आप्पांबद्दल त्यांना स्वतःला अतिशय आदर वाटत असे. मा. नारायणराव राणे साहेब आणि आप्पा यांचे जे जिव्हाळ्याचे संबंध होते ते संबंध माझ्याशी जोपासण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला होता. मीही आप्पांचे राणे कुटुंबाशी असलेले राजकारणा पलीकडचे संबंध लक्षात घेऊन नितेश राणे यांना प्रतिसाद दिला होता. मात्र यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. राजकारणाच्या ठिकाणी आम्ही एकमेकांचे विरोधकच होतो. त्या काळात माझे नितेश राणे यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यामुळे भारतीय जनता पक्षामध्येही मला थोडाफार त्रास सहन करावा लागला. देवगड येथे असलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पाला स्व. आप्पांचे नाव द्यावे असा नितेश राणे यांचा मानस होता. त्यानुसार त्यावेळी त्यांनी तिथे आप्पांच्या नावाचा एक बोर्ड स्वतः लावला. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी मला आवर्जून बोलावले होते आणि आप्पांच्या नावाचा बोर्ड लावला जात आहे, या आनंदाने मीही त्याठिकाणी उपस्थित राहिलो. माझ्या हस्ते नारळ वाढवून नितेश राणे यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. मात्र त्यानंतर भाजपा अंतर्गत माझ्यावर खूप टीका झाली. पक्षाचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यानंतर मला एक प्रेस घेऊन याबाबत खुलासा करावा लागला होता. खरे तर याची काही गरज नव्हती, पण पक्षीय राजकारणाचा भाग म्हणून हे करणे आवश्यक आहे असे मला सांगण्यात आले आणि त्याला मान देऊन मी ते केले. मात्र नितेश राणे यांनी यानंतर माझ्यावर कोणताही राग धरला नाही किंवा त्यांचे माझ्याशी असलेले स्नेहपूर्ण संबंध तसेच अबाधित राहिले.

हे झाले माझे आणि नितेश राणे यांचे वैयक्तिक मैत्रीबाबत. मात्र आज नितेश राणे देवगड - कणकवलीचे आमदार म्हणून आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून जे कार्य करीत आहेत ते खूप कौस्तुकास्पद आहे. तसे वयाने, अनुभवाने लहान असले तरी त्यांना असलेली जाण खूप मोठी आहे. त्यांचे वडील आदरणीय राणे साहेब यांच्याकडून बाळकडू घेऊन राजकारणात उतरलेले असल्यामुळे सार्वजनिक काम कसे धडाकेबाज करावे याचे चांगले ज्ञान त्यांना आहे. एखादा प्रश्न किंवा समस्या समोर आल्यावर त्याच्या मुळाशी जाऊन तत्काळ सोडवण्याची त्यांची पद्धत पाहिल्यावर मला आप्पांच्या कार्यपद्धतीचा भास होतो. भिजत घोंगडे ठेवण्याची त्यांची पद्धत नाही आणि लपून छपून काही नाही, जे असेल ते त्वरित आणि सर्वांसमोर.

भारतीय जनता पक्षात माननीय राणे साहेब यांच्या प्रवेशाने मला व्यक्तिशः खूप आनंद झाला. कारण राणे साहेब शिवसेना सोडून जेव्हा काँग्रेस पक्षात गेले होते तेव्हा आप्पांनी त्यांना सांगितले होते की, तुम्ही चूक करीत आहात. तुमच्या कर्तृत्वाची कदर काँग्रेसमध्ये होणार नाही, त्यापेक्षा आमच्याकडे या. राणे साहेबांसारखा कर्तृत्ववान नेता आपल्याकडे हवा तरच कोकणचा विकास होईल असे आप्पांचे मत होते. त्यामुळे राणे कुटुंबीयांनी भाजपा प्रवेश केला, हे मला खूप आवडले होते. त्यात नितेश राणे यांच्याशी असलेला माझा स्नेह अधिकृत होईल याचाही आनंद होता.

हिंदुत्व म्हणून त्यांनी जो भगवा मस्तकी धारण केला आहे, त्याची फार गरज होती. आज महाराष्ट्रात कुठेही आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांनी जहाल हिंदुत्ववादी म्हणून जी छाप पाडली आहे आणि केवळ पोकळ गप्पा मारीत न बसता ते स्वतः जे अॅक्शन मोडमध्ये नेहमी असतात त्याला तोड नाही. त्यामुळे सर्वसामान्य हिंदू विचारसरणीच्या लोकांना एक पॉवर मिळाली आहे. जिथे जिथे धर्मविरोधी कारवाया दिसतात त्या ठिकाणी नितेश राणे तत्काळ उपस्थित होतात आणि त्यांच्या स्टाईलमध्ये विषय फिनिश करून टाकतात. त्यामुळे देशविरोधी आणि हिंदू विरोधी कारवाया करणाऱ्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत.

नितेश राणे यांचा आज वाढदिवस आहे. कमी वयात आपण राजकारणात पूर्ण पारंगत झाला आहात. अजून खूप उंची आपल्याला गाठायची आहे. आपली उमेद ही भरपूर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एक एक पायरी वर वर जाणार हे आपण आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलेच आहे. मात्र हे करीत असताना आपण आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्यावी. शंभराहून अधिक वर्षांचे आयुष्य आपल्याला लाभावे आणि आपल्या हस्ते या परशुराम भूमीचा कायापालट व्हावा. या भूमीत हाताला काम आणि मुखामध्ये राम या सूत्राने आपल्या हातून भरभरून विकास साध्य व्हावा अशा आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपल्या कुटुंबीयांनाही उत्तम आरोग्य चिंतितो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र!

Comments
Add Comment