सुरांचा राजहंस!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


काल जागतिक संगीत दिन होता. संगीत निसर्गात ओतप्रोत भरलेले आहे. सृजनशीलतेच्या खुणा निसर्गात सर्वत्र दिसतात. त्यात पाऊस सुरू झाला की, जागोजाग हिरवाई रुजते. मनांना आतून चैतन्य बहाल करणारी आणखी एक गोष्ट आपण अनुभवतो, ती म्हणजे संगीत. महाराष्ट्राला संगीताचे अपरंपार देणे लाभले आहे. शब्दांना सुरांचे कोंदण देणारे जे संगीतकार महाराष्ट्राला लाभले त्यात श्रीनिवास खळे यांचे नाव मोठे आहे. खळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. परिस्थितीवर मात करून खळे यांनी आपला संघर्ष सुरू ठेवला. कलेला शरण कसे जावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.


प्रसिद्धी आणि पैसा या दोन गोष्टींसाठी खळेंनी कधीही तडजोड केली नाही.


त्यांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. ‘जिव्हाळा’ हा त्यातील एक महत्त्वाचा चित्रपट.’ या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या. जाहल्या, तिन्हीसांजा जाहल्या, हे या चित्रपटातील व्याकुळ करणारे गीत आठवले की मन बैचेन होते. बालगीतांची तर त्यांनी अक्षरशः बरसातच केली. टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, त्या तालावर - त्या तालावर गाणे अमुचे जुळे ही शालेय जीवनाच्या टप्प्यावरची कविता खळे यांच्या संगीताने सुंदर सजली. गोरी गोरीपान, आई आणिक बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा यासारखी बालगीते आपण अगदी सहज गुणगुणतो. प्रेमगीते तर अगणित पहिलीच भेट झाली, लाजून हासणे अन्, शुक्रतारा मंदवारा, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुधोळ वारा, हात तुझ्या हातातून धुंद ही हवा अशी हळुवार गाणी प्रेमाचे इंद्रधनू साकारतात.


श्रावणात घननिळा बरसला हे गीत तर पावसात हमखास आठवते. झाडांवर फुललेला हिरवा मोरपिसारा आपल्या तनामनात फुलतो. खळेंच्या संगीतातील विविधता चकित करते. त्याकाळी इतके विकसित झालेले तंत्र नव्हते आज अनेक ट्रॅक्सवर विविध वाद्ये आणि आवाजांचे धनिमुद्रण करून आधुनिक पद्धतीने त्यांचे मिश्रण केले जाते. पण ही सोय नव्हती त्या काळात खळेकाकांनी जो वाद्यमेळ, मेडली सजवली, त्या जादूला खरोखर सलाम!


तुकोबांचे अभंग त्यांनी संगीताने सजवले आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ते आपल्यापर्यंत पोहोचले. सुंदर ते ध्यान, भेटीलागी जीवा लागलीसे आस, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, आनंदाचे डोही, हेचि दान देगा देवा यासारखे तुकोबांचे अभंग त्यातील आर्ततेसह खळे यांनी आशय ओळखून अचूक सजवले.


लहानपणी संगीताचा ध्यास घेतलेल्या खळेकाकांनी संगीताचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला पण तेव्हा ‘‘हे पोर गाणे बजावणे सोडत नाही. स्वतः रस्त्यावर भीक मागेल आणि आपल्यालाही उभे करेल’’ असे शब्द त्यांना घरातच ऐकायला मिळाले. श्रीनिवास खळे यांच्यात लपलेला सुरांचा राजहंस तेव्हा बाबांना उमगला नाही. विविध पोतांची गाणी आपल्यासाठी सजविणाऱ्या या सुरांच्या राजहंसाला विनम्र अभिवादन!

Comments
Add Comment

ग्रंथ हेच गुरू

वैभववाडी : मंदार सदाशिव चोरगे ग्रंथ कोंडून ठेवू नका, कपाटात सुरक्षित... जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र

लढाऊ रेवती

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे राजेशाही आयुष्य पाहिल्यानंतर सामान्य जीवन जगण्यास आले तर कोणीही आपल्या नशिबाला दोष

व्यक्तिमत्त्व विकास

मोरपिस : पूजा काळे व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यात साहित्याच्या योगदानाचा विषय महत्त्वाचा ठरतो. भाषा

अनुवादातून संवाद

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर अनुवाद हा विषय भाषिक आदान-प्रदानाशी अत्यंत जवळचा विषय आहे. भारत हा या अर्थाने अतिशय

वृद्धांचा सन्मान आणि सुरक्षितता

माध्यमांनी वृद्धांचे सकारात्मक योगदान आणि त्यांचे अनुभव प्रदर्शित करून समाजातील वृद्धांविषयीचे नकारात्मक

चव, चिकाटी आणि चैतन्याचा स्वाद

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवी अन्नपूर्णा हे त्या शक्तीचं एक रूप. अन्न देणं,