संतूने केली कमाल...

कथा : रमेश तांबे


संध्याकाळचे सात वाजले होते. बाहेर काळाकुट्ट अंधार पसरला होता. झाडेझुडपे माना खाली टाकून बसली होती. गाई-गुरे गोठ्यात रवंथ करत निवांत बसली होती. दूरवरच्या देवळात आरती सुरू झाली अन् तिथल्या घंटांचा आवाज साऱ्या आसमंतात सगळीकडे पसरत होता. एका चमत्कारिक आणि गूढ अशा वातावरणात संतू आपल्या घरात बसून जेवत होता. आज तो घरात एकटाच होता. त्याचे आई-बाबा मावशीला बघायला परगावी गेले होते. त्यामुळे सर्व घराची जबाबदारी एकट्या संतूवरच होती.


संतू साधारण तेरा-चौदा वर्षांचा असावा. आठवी-नववीच्या वर्गात असेल तो. थोडासा घाबरट, शांत, कोणाशी पटकन न बोलणारा, थोडासा अबोल, प्रत्येक ठिकाणी मागे राहणारा! खरं तर संतूची आई त्याला त्यांच्यासोबत नेणार होती. पण उद्या संतूची परीक्षा होती. त्यामुळे तो घरीच थांबला होता. खरं तर बाबांना संतूचा स्वभाव बदलायचा होता. पदोपदी त्याचं घाबरणं त्यांना आवडत नव्हतं. आपल्या मुलाने धाडसी असावं, चार लोकांत त्यानं उठून दिसावं, प्रत्येक गोष्टीत भाग घ्यावा असं त्यांना वाटायचं. पण संतू तर मुलखाचा घाबरट. त्याला कसं बदलायचं याचाच विचार बाबा नेहमी करत असायचे.


ती संधी बाबांना आज मिळाली. संतूच्या मावशीची तब्येत अचानक बिघडली आणि तिला पाहायला परगावी जावं लागणार होतं. म्हणून आई-बाबा दोघेही संतूवर घराची जबाबदारी टाकून निघून गेले होते. सकाळीच बनवून ठेवलेले जेवण संतूने गरम करून घेतले आणि तो जेवू लागला. तेवढ्यात स्वयंपाक घरातून भांडे पडल्याचा मोठा आवाज आला. उंदराने करामत केली होती. पण तो आवाज ऐकून संतूच्या अंगावर सर्रकन काटा आला. तो हळूच स्वयंपाक घरात डोकावला तर एक भांडे जमिनीवर पडलेले त्याला दिसले. ते त्याने उचलले आणि परत जेवायला बसला. तेवढ्यात एक काळा बोका नेमका त्याच्यासमोर येऊन बसला. संतूला कळेना अरेच्चा हा काळा बोका कुठून आला! आपल्या घरात तर पांढऱ्याशुभ्र रंगाची मांजर आहे. त्याच्या मनात विचारचक्र सुरू झाले. आता बोक्याचे गुरगुरणे चालू झाले. तसा संतू घाबरला. त्यांनी हातातला पाण्याचा ग्लास बोक्याला फेकून मारला. तसा बोका कुत्र्यासारखा भुंकू लागला. अरेच्चा! हे काय? हा बोका कुत्र्यासारखा कसा भूंंकतो आहे. आता मात्र घरात भुताटकी आहे याची संतूला खात्री पटली. मग बोक्याला त्याने तेथून पळवून लावले आणि भरभर जेवण आटोपले.


आपले लवकर झोपून घ्यावे या विचाराने तो झोपण्याच्या खोलीत आला. सकाळी आई सारे घर नीट करून गेली होती. मग घरात हा पसारा कोणी केला. संतूच्या मनावर आता भीतीने ताबा मिळवला होता. तो चटकन बिछान्यात शिरला अन् तोंडावर चादर ओढून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. तितक्यात पंखा बंद झाला. खोलीत मंद बल्ब तर चालूच होता. मग पंखा कसा बंद झाला. का कोणी केला? संतूने पाहिले अरेच्चा पंख्याचं बटण बंद कसं झालं? संतू नकळत ओरडला.


पंखा सुरू करून संतू पुन्हा बिछान्यात शिरला. आता मात्र कधी लाईट, तर कधी पंखा बंद पडू लागला. कधी आपोआपच टीव्ही सुरू व्हायचा. आता मात्र संतूची बोबडीच वळली. तो आई आई ओरडू लागला. चादरीत तोंड लपवून रडू लागला. तेवढ्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. आता मात्र संतूने तो खांद्यावरचा हात धरला अन् सर्व ताकद लावून जोरात पिळला. क्षणभर
संतूलाच कळले नाही की आपल्यात एवढी ताकद आली कुठून.


“अरे संतू सोड माझा हात, अरे सोड! अरे तुझा बाबा आहे मी! सोड मला.” संतूने हात न सोडताच शेजारचे बटन दाबले अन् लाईट चालू झाले. घरात प्रकाश पसरताच संतूला बाबा दिसले अन् तो ओरडला, “बाबा तुम्ही इथे काय करत आहात अन् आई कुठे आहे?” बाबा म्हणाले, “अरे आधी हात सोड माझा. हाडं मोडतील माझी. किती जोराने पिळलास माझा हात.” मग संतूने बाबांचा हात सोडला. बाबांनी स्वतःचा हात तपासून बघितला अन् संतूला सांगू लागले, “अरे तुझी आईच म्हणाली, संतू एकटा घरात राहणार नाही. तो घाबरेल. जा तुम्ही त्याच्या सोबतीला. म्हणून आलो. म्हटलं चला तुझी गंमत करू, जरा तुला घाबरवू. पण तू तर भलताच डेअरिंगबाज निघालास. तू तर चक्क माझा हातच पिळलास, तोही इतक्या जोरात? कुठून मिळवली एवढी ताकद. अरे घरातल्या सर्व गोष्टी मीच करत होतो. पण तू प्रसंगावधान राखलेस अन् माझ्यावरच मात केलीस. मला तुझा अभिमान वाटतो. माझा मुलगा धाडसी आहे, याचा मला खूप आनंद आहे.” बाबांचे बोलणे ऐकून संतूने बाबांना गच्च मिठी मारली.

Comments
Add Comment

पोटपूजेचाही उत्सव!

खास बात : विष्णू मनोहर प्रसिद्ध बल्लवाचार्य दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे तसेच शरीर ऊर्जावान ठेवणाऱ्या

भारतासाठी नवी चिंता

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’नंतर भारत आणि पाकिस्तानच्या दिशा बदलल्या. पाकिस्तानने

अभिनय सम्राट डॉ. काशिनाथ घाणेकर

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर अभिनय सुरू करण्याआधी घाणेकर व्यवसायाने दंतवैद्य होते. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म १४

अतिलाडाने तुम्ही मुलांना बिघडवत, तर नाही ना?

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू पालक या नात्याने आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक वस्तू घेऊन द्यावी असं

‘अब ये सुहाना साथ ना छुटे...’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे सिनेमासाठी ‘गुमराह’ हे शीर्षक बी. आर. चोपडा, महेश भट आणि वर्धन केतकर या तीन

देवाची मदत...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर माझ्या लहानपणी मी वडिलांच्या तोंडून ऐकलेली एक गोष्ट सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते.