Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मुंबईचे अतिरिक्त आयुक्त अजूनही ठाण्यातील एमआयडीसीच्या निवासस्थानातच

मुंबईचे अतिरिक्त आयुक्त अजूनही  ठाण्यातील एमआयडीसीच्या निवासस्थानातच

ठाण्यातील घरांच्या भाड्यापोटी उचलावा लागतो महापालिकेला खर्च

मुंबई  : मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झालेले डॉ. विपीन शर्मा यांनी ठाण्यातील निवासस्थानाचा अधिकार सोडलेला नसून या निवासस्थानाचे भाडे आता महापालिकेला अदा करावे लागत आहे. शर्मा राहत असलेल्या बंगल्याचे मासिक भाडे सुमारे २ लाख रुपये एवढे असून मलबार हिल आणि महापालिकेचे भायखळा राणीबागेतील पूर्वीचा उद्यान अधिक्षक आणि आता नुतनीकरणानंतर अतिरिक्त आयुक्त यांच्या निवासासाठी वापरण्यात येणारे बंगले रिकामे असूनही महापालिकेला अतिरिक्त आयुक्तांच्या ठाण्यातील निवासस्थानासाठी प्रति माह सुमारे २ लाख रुपये खर्च करावा लागत आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची मुंबई महापालिकेत बदली होण्यापूर्वी ठाणे (प) येथील मानपाडा, निलकंठ बुड येथील बंगला क्र. १६ येथे निवासाला होता. हे निवासस्थान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत असताना शर्मा यांना वितरीत झाले होते.

एमआयडीसीने सीईओ पदासाठी ठाण्यातील मानपाडा निलकंठ बूडमधील बंगला क्रमांक १६ भाडेतत्वावर घेतला होता; परंतु शर्मा यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाल्यानंतर याच निवासस्थानी राहणे पसंत केले आणि एमआयडीसीने भाडेतत्वावर घेतलेल्या या बंगल्याचे भाडे मुंबई महापालिकेला अदा करण्याची विनंती केली.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर पहिल्या घरमालकाबरोबर महानगरपालिका ज्या दिनांकापासून नवीन कंत्राट करील त्या ३१ ऑगस्ट २०२४ पासून ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या कालावधीकरिता १२ लाख २४ हजार ५२८ एवढ्या रकमेचे; आणि १ एप्रिल २०२५ पासून पुढील कालावधीसाठी घरभाड्यापोटी येणाऱ्या खर्चाला मान्यता दिली आहे.

या घरभाडयापोटी येणाऱ्या खर्चाच्या रकमेत मालमत्ता कर, दूरध्वनी देयके, गॅस जोडणी आकार व देयके, विद्युत देयके, पाणीपुरवठा देयके, सुरक्षा व्यवस्था, दुरुस्तीची कामे, वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कराराची कामे आणि इतर संबंधित शुल्क आदी रक्कम देण्यात येत आहे. त्यामुळे मासिक दोन लाख रुपयांपेक्षा अधिक घरभाडे ठाण्यातील निवासस्थानासाठी मोजावे लागत आहे.

Comments
Add Comment