Friday, August 22, 2025

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रशियाच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री मॉस्कोला रवाना

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर रशियाच्या राष्ट्रपतींना भेटण्यासाठी इराणचे परराष्ट्र मंत्री मॉस्कोला रवाना

तेहरान : अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे रविवारी (दि.२२) दुपारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी मॉस्कोला रवाना झालेत. मध्य पूर्वेतील वाढलेल्या तणावादरम्यान ते उद्या, सोमवारी (दि.२३) यांची भेट घेतील. इराणच्या तीन प्रमुख अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनंतर काही तासांतच अराघची यांनी ही माहिती दिली.

अराघची म्हणाले, "रशिया हा इराणचा मित्र आहे. आम्ही नेहमीच एकमेकांशी चर्चा करत असतो. मी आज दुपारी मॉस्को येथे जात असून उद्या सकाळी रशियन राष्ट्रपतींसोबत गंभीर चर्चा करेन." त्यांनी ही माहिती इस्तांबुल येथे OIC (इस्लामिक सहकार्य संघटना) शिखर परिषदेदरम्यान आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, अराघची आणि पुतिन यांच्या भेटीसंदर्भात चर्चांना उधान आले आहे. आता इराण अमेरिकेविरोध राजकीय आणि लष्करी रणनीतीत रशियाची मदत घेऊ शकतो. तत्पूर्वी, रशियाने इराणवर केलेल्या कारवाईसंदर्भात रशियाने नाराजीही व्यक्त केली होती.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर आता राजनैतिक चर्चेला काही अर्थ उरला नाही. कुटनीतिचा रस्ता कायम खुला ठेवायचा हे जरी योग्य असले तरी आता ती परिस्थिती राहिलेली नाही, असे अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. जेव्हा अमेरिकेसोबत चर्चा सुरु होती तेव्हा इस्रायलने आमच्यावर हल्ला केला. तिथेच कुटनीती संपली. यानंतर आम्ही युरोपिय देशांशी चर्चा करत असताना अमेरिकेने हल्ला केला आणि ती प्रक्रिया देखील संपवली. आता, एवढे सर्व होऊनही, इराणने चर्चेच्या मार्गावर परतावे, असे युरोप कसे म्हणू शकतो? असा सवालही अराघची यांनी केला. आम्ही जर चर्चा सोडलीच नाही तर परतायचे कसे? ती बंद करायचे आम्ही तर ठरविले नाही. आमच्यावरच हल्ले करण्यात आले आहेत," असा आरोप अराघची यांनी केला आहे.

Comments
Add Comment