सौंदर्य ब्रँड फॉरेस्ट इसेन्शियल्सलच्या संस्थापिका

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे


वयाच्या २० व्या वर्षी लग्न, ते लग्न फसणं, एकल पालक बनून मुलांना वाढवणं अशा आयुष्याच्या संघर्षातून वयाच्या पंचेचाळिशीमध्ये छोटा व्यवसाय सुरू केला. २५ वर्षांनंतर हा व्यवसाय काही हजार कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ही संघर्षगाथा आहे फॉरेस्ट इसेन्शियल्सलच्या संस्थापिका मीरा कुलकर्णी यांची.

मीराचं बालपण दिल्लीत गेले. शिक्षणासाठी मीरा शिमला आणि नंतर मद्रासच्या वसतिगृहांमध्ये राहिली. आई-बाबा, आजी आणि छोटी बहीण असं तिचं सुंदर कुटुंब होतं. वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत तिच्या कुटुंबाला दुःखाची झळ नव्हती. पण आयुष्य नेहमीच परिटघडीतल्या कपड्यासारखं नसतं. आयुष्याने तिच्यासमोर एक विचित्र पर्याय समोर ठेवला. एका उद्योजकाकडून आलेला लग्नाचा प्रस्ताव किंवा केंब्रिजमधील शिक्षण. मिराला बदलाची भीती वाटत होती. परदेशात जाणे हे म्हणजे नवीन जग, नवीन लोक. तिथे आपला निभाव कसा लागणार. तिने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्नाचा पर्याय निवडला.

पण लवकरच तिला पश्चात्ताप होऊ लागला. दोन मुलांनंतर, तिच्या पतीचा व्यवसाय बिघडू लागला आणि त्यासोबतच दारूचे व्यसनही जडले. व्यवसायातील अपयश आणि दारूचे व्यसन यामुळे मीराच्या कौटुंबिक जीवनात वादळ आलं. ती पतीपासून विभक्त झाली. दिल्लीला माहेरी परतली. वयाच्या २८ व्या वर्षी तिने एकटीने आपल्या दोन लहान मुलांना वाढवले. पैशांची बचत नव्हती. उपजीविकेसाठी तिने दिल्लीतील अर्धे घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. १९९९ च्या उन्हाळ्यात तिच्या आयुष्यात एक वेगळे वळण आले. घरी असताना सतत वीज जात होती. मेणबत्त्या सातत्याने जळत होत्या. मीरा आणि तिची मुलं वितळलेल्या मेणबत्त्या गोळा करत आणि त्या पुन्हा गरम करून नवीन बनवत. कदाचित ती कॅन्डलमेनियाची सुरुवात होती. पण ती तर फॉरेस्ट इसेन्शियल्सची सुरुवात होती, जी अद्याप कोणालाही माहीत नव्हती.

मीरा मेणबत्ती बनवण्यापासून हळूहळू साबण बनवण्याकडे वळली. काही ऑर्डर मिळाल्याने ती तिच्या गॅरेजमधून काम करू लागली. हाताने बनवलेला साबण बनवण्याची प्रक्रिया शिकत असताना, मीराला जाणवले की, भारतात चांगल्या दर्जाचे साबण नाहीत. प्राचीन परंपरेने परिपूर्ण असलेले ऋषिकेश हे आयुर्वेदाचे माहेरघर मानले जाते. या ठिकाणी उत्तम नैसर्गिक साबण तयार करणारे कोणी तरी भेटेल याची तिला खात्री होती. मीराने काही आयुर्वेदिक वैद्यांना साबण तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी विचारले. पण त्यातील घटक महाग होते. उच्च किमतीचा एक फायदा होता. ते उत्कृष्ट, शुद्ध उत्पादन आहे अशी ग्राहकांची खात्री असे. मध्यम आणि उच्चवर्गीय ग्राहकांना ते परवडू शकत होते.

चाचण्या आणि प्रयोगांनंतर, साबण विकण्यास सज्ज झाले आणि नंतर हळूहळू विकले जाऊ लागले. ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’ या नावाने ते बाजारात ओळखू जाऊ लागले. मीराने लवकरच मसाज तेल तयार केले. त्यानंतर उटणे आणि मिल्क बाथ तयार केले. ऑर्डर्स वाढल्याने स्वतःचे दुकान सुरू करण्याचे मिराने ठरवले. दिल्लीच्या खान मार्केटमध्ये ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’चे पहिले दुकान सुरू झाले. तीन महिन्यांत तिला जाणवले की, खान मार्केट स्टोअर चांगलेच यशस्वी झाले आहे. फॉरेस्ट इसेन्शियल्स बॉडी पॉलिश, केसांचे तेल, सीरम आणि बरेच काही विकत होते. हयात रीजन्सी दिल्लीने तिचे साबण ऑर्डर केले तेव्हा फॉरेस्ट इसेन्शियल्सला लोकप्रियता मिळाली. २००५-६ पर्यंत विक्री ६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.

एस्टी लॉडर या सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील अमेरिकन कंपनीने ‘फॉरेस्ट इसेन्शियल्स’सोबत भागीदारी करण्यात स्वारस्य दाखवले. कंपनीचे अध्यक्ष लिओनार्ड लॉडर यांनी मीरा प्रत्यक्ष भेट घेतली आणि २००८ मध्ये, दोन्ही कंपन्यांनी अधिकृतपणे भागीदारीवर स्वाक्षरी केली. एस्टी लॉडर टीमला त्यांचे काम इतके आवडले की, त्यांनी फॉरेस्ट इसेन्शियल्समध्ये २० टक्के हिस्सा खरेदी करण्याची ऑफर दिली. या भागीदारीमुळे प्रक्रिया नियंत्रण न सोडता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मापदंड आणले गेले. फॉरेस्ट इसेन्शियल्स ताज, ओबेरॉय, हयात, द रिट्झ-कार्लटन सारख्या उच्च दर्जाच्या हॉटेल्सना सुविधा पुरवते आणि हरिद्वारमध्ये GMP-प्रमाणित उत्पादन सुविधा आहे. त्यांनी २०२२ च्या अखेरीस लंडनमधील कोव्हेंटगार्डन येथे त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय स्वतंत्र स्टोअर उघडले.

सहस्त्रकाच्या सुरुवातीला दिल्लीतील गॅरेजमध्ये २ लाख रुपये गुंतवणूक आणि दोन कर्मचाऱ्यांसह फॉरेस्ट एसेन्शियल्सचा सुरू झालेला हा प्रवास आता भारतातील २८ शहरांमध्ये कंपनीच्या मालकीच्या आणि कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या ११० स्टोअर्समध्ये रूपांतरित झाला आहे, ज्यामध्ये आणखी स्टोअर्स वेगाने जोडल्या जात आहेत. संपूर्ण आग्नेय आशियातील १४० हून अधिक स्पा आणि ३०० हॉटेल्सना फॉरेस्ट इसेन्शियल्स सेवा पुरवते, त्यांचे वितरण चॅनेल एकूण १२० देशांमध्ये पोहोचले आहे. मीराला फॉर्च्यून इंडियाच्या यादीत उद्योग-व्यवसायातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून नामांकन मिळाले होते. २०२० मध्ये तिने ईटी प्राइम वुमन लीडरशिप अॅवॉर्ड जिंकला. कोटक वेल्थ हुरुन - अग्रगण्य श्रीमंत महिला २०२० अहवालानुसार मीराची एकूण संपत्ती १२९० कोटी रुपये इतकी आहे.

मीरा या यशाचे श्रेय त्यांच्या विश्वासाला आणि दृढनिश्चयाला देतात. आयुष्यात कधीही एक दिवस काम न केलेल्या मिराने मुलीच्या लग्नानंतर वयाच्या ४५ व्या वर्षी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती यशस्वी होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे मीरा कधीही समाधानी नव्हती. तिला नेहमीच बरेच काही करायचे होते. प्रत्येक वेळी सर्वोत्तम देण्याचा तिचा ध्यास असायचा. “जो कोणी म्हणतो की काहीतरी शक्य नाही यावर कधीही विश्वास ठेवू नका. तुम्ही मार्ग शोधू शकता आणि काहीही घडवून आणू शकता. तुम्हाला फक्त ते पुरेसे हवे आहे,” असा मीरा संदेश देते. मीरा कुलकर्णी या सर्वार्थाने उद्योग क्षेत्रातील लेडी बॉस आहेत.
Comments
Add Comment

ग्रंथ हेच गुरू

वैभववाडी : मंदार सदाशिव चोरगे ग्रंथ कोंडून ठेवू नका, कपाटात सुरक्षित... जिथे ग्रंथ कोंडले जातात तिथे राष्ट्र

लढाऊ रेवती

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे राजेशाही आयुष्य पाहिल्यानंतर सामान्य जीवन जगण्यास आले तर कोणीही आपल्या नशिबाला दोष

व्यक्तिमत्त्व विकास

मोरपिस : पूजा काळे व्यक्तिमत्त्व विकासाच्या टप्प्यात साहित्याच्या योगदानाचा विषय महत्त्वाचा ठरतो. भाषा

अनुवादातून संवाद

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर अनुवाद हा विषय भाषिक आदान-प्रदानाशी अत्यंत जवळचा विषय आहे. भारत हा या अर्थाने अतिशय

वृद्धांचा सन्मान आणि सुरक्षितता

माध्यमांनी वृद्धांचे सकारात्मक योगदान आणि त्यांचे अनुभव प्रदर्शित करून समाजातील वृद्धांविषयीचे नकारात्मक

चव, चिकाटी आणि चैतन्याचा स्वाद

दी लेडी बॉस : अर्चना सोंडे नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवी अन्नपूर्णा हे त्या शक्तीचं एक रूप. अन्न देणं,