मुंबई : मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १३ जण जखमी झाले आहेत. ऑर्किड टॉवर येथे ही भीषण आग लागल्याची माहिती आहे. ऑर्किड टॉवरच्या बिल्डिंग नंबर सहाच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
तेथील स्थानिक लोकांच्या माहितीनुसार घाटकोपर परिसरातील पंतनगर भागात असेलल्या रमाबाई कॉलनीमधील शांती सागर इमारतीत रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागलेली होती. या इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये आग लागली असल्यामुळे इमारतीतील वायर जळून खाक झाल्या. ही आग लागल्यानंतर इमारतीतील भयभीत झालेल्या लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आग लागल्यानंतर लोकांची पळापळ सुरु झाली, त्यामुळे काही इमारतीच्या मजल्यावर लोक अडकले होते.
शांतीसागर इमारतीत आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशामक दलाने तातडीने घटना स्थळी धाव घेतली. अग्नीशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन ही आग तीड तासात आटोक्यात आणली. या आगीत १३ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. जखमी झालेल्या रुग्णांमध्ये ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. यातील १२ जणांवर उपचार सुरु आहेत, जखमी झालेल्या एका रुग्णाची प्रकृती ठिक असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.