Saturday, June 21, 2025

कृत्रिम बुद्धिमत्ता

कृत्रिम बुद्धिमत्ता

ओंजळ : पल्लवी अष्टेकर


आजचे जग स्मार्ट झालेय, पण आपणही तितकेच स्मार्ट झालोय का? मोबाइल हातात घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रश्न-जी कामे आपण करतो त्यात वेळ, श्रम व पैसा वाचवू शकतो का?
उत्तर आहे – हो, जर आपण “कृत्रिम बुद्धिमत्ता” म्हणजेच Artificial Intelligence (एआय)चा योग्य वापर करत असू, तर नक्कीच.


कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त वैज्ञानिक, संगणक अभियंते किंवा मोठ्या कंपन्यांचे क्षेत्र उरलेले नाही. आता ही एक अशी गोष्ट झाली आहे, जिचा वापर सामान्य शेतकरी, गृहिणी, दुकानदार, विद्यार्थी-अगदी कुणीही करू शकतो.


थोडक्यात सांगायचे झाले, तर एखादी मशीन किंवा अ‍ॅप आपल्यासारखे विचार करतं, शिकतं, निर्णय घेतं - हे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. गाणी सुचवणं, व्हाॅट्सअॅपवर भाषांतर करणं, फोटोवरून मजकूर ओळखणं हे सगळं एआयद्वारे शक्य झालंय. एआय सर्व-सामान्यांसाठी उपलब्ध आहे. मोबाइलवर गुगल, व्हाॅट्सअॅप, चॅटजीपीटी अशा ॲप्समधून एआयचा वापर करता येईल.


सामान्य माणसासाठी उपयुक्त एआय टूल्स - थेट वापरण्यासारखी आहेत.
१. चॅटजीपीटी : एखादा प्रश्न विचारायचा, माहिती हवी आहे, एखादा निबंध, ईमेल, कविता, भाषांतर हवं आहे का? चॅटजीपीटी वापरा.
२. डीएएलएलई – “पावसात भिजणारा शेतकरी” किंवा “आकाशात उडणारी वाघीण” असं चित्र हवंय? लिहा आणि बघा, हे टूल चित्र तयार करतं! लिहिलेल्या वर्णनावरती हे एआय ॲप तुम्हाला सुंदर चित्रे बनवून देऊ शकेल.
३. कॅनवा एआय टूल्स : एखादी जाहिरात, सोशल मीडिया पोस्ट, लग्नपत्रिका, मेनू कार्ड तयार करायचा आहे? एका झटक्यात तुम्हाला अतिशय कठीण डिझाईन्स चुटकीसरशी मिळून जातील. कॅन्वाचे Magic Write आणि Design AI वापरा.
४. Google Translate + Lens : एखादी परदेशी भाषा वाचायची आहे - फोटो काढा आणि तुमच्या भाषेत वाचा : हाही एआयचा चमत्कार आहे किंवा गुगल लेन्स वापरून एखाद्या फोटोमधली कुठलीही गोष्ट ओळखा. एखाद्या वनस्पती किंवा चित्रावरून तिचा पूर्ण तपशील मिळवा.
५. Microsoft Copilot / Bing AI : ऑफिसचं काम स्मार्ट करायचंय? रिपोर्ट, मेल, एक्सेलमध्ये सूत्र तयार करायचंय? Copilot तुमचं काम सोपं करतो.
६. युट्यूब एआय : तुम्ही काय शिकताय, पाहताय – त्यावरून तुमच्यासाठी सुचवलेले व्हीडिओ हे एआयमुळेच शक्य आहे.
७. Grammarly AI : इंग्रजी लिहायचं आणि चुकायचं नसेल, तर हे टूल तुम्हाला उत्तम पद्धतीत मदत करू शकेल. या सर्व गोष्टी व खूप काही सहजरीत्या ही साधनं तुम्हाला मदत करू शकतील.


कसा उपयोग करावा सामान्य माणसाने? काही आपण उदाहरणार्थ बघूया.
शेतकरी : आपला भारत देश शेतीप्रधान आहे. शेतकरी मोबाइल अ‍ॅप्समधून हवामान, खत, कीड नियंत्रण, मार्केट दर मिळवू शकतो. हवामानाचा अंदाज, अचूक माहिती एआयला देईल. शेतकऱ्याला तो अशा अनेक प्रकारात मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे शेतीला नुकसान पोहोचणार नाही.
विद्यार्थी : चॅटजीपीटीवरून शंका सोडवा, भाषांतर करा, नोट्स काढा, परीक्षेची तयारी करा या गोष्टी सुलभ होतात.
गृहिणी : घरगुती व्यवसायासाठी Canva वापरून डिझाईन तयार करा, चॅटजीपीटीकडून यादी करा. घरगुती काम, उद्योग, कपड्यांवर डिझाईन्स, हातावरची कामे जसे एमब्राॅयडरी, तोरण, रांगोळी, घर सजावटीच्या गोष्टी बनवायच्या असतील, तर अशा सगळ्यांमध्ये एआयचा वापर होऊ शकतो.
दुकानदार : सोशल मीडियासाठी पोस्ट तयार करा, ग्राहकांशी संवाद साधा, चॅटजीपीटीकडून जाहिरात मजकूर तयार करून घ्या. दुकानाची जाहिरात, सुसंवाद या सर्व गोष्टींसाठी एआय तुम्हाला मदत करू शकतो.
नोकरी करणारे : एक्सेलमध्ये गणितं, वर्डमध्ये ईमेल ड्राफ्ट - सगळं एआयचं
काम आहे. एआय काॅम्प्युटर प्रोग्रॅमदेखील
लिहू शकतो.


हे शिकायचं कसं? भीती वाटून घेऊ नका. युट्यूबवर मराठीत हजारो शिकवणारे व्हीडिओ आहेत. गुगलचे मोफत कोर्सेस, चॅटजीपीटी वापरून स्वतःच सराव, Canva वापरत डिझाइन शिकणं - हे सगळं “तुमच्या मोबाइलवरून” शक्य आहे.


थोडं सावधपणा गरजेचा आहे, एआय आपल्या जागा घेणार नाही, पण आपले विचार करणे थोडे कमी करू शकते - जर आपण त्यावर अंधपणे विसंबला असाल तर. खोटी माहिती, बनावट फोटो (deepfake), गोपनीय माहितीचा गैरवापर - याची
जाणीव असायलाच हवी. आपण वापरणार,पण विचारपूर्वक!
सुनिश्चितपणे एआय आपल्या भविष्याचे कायापालट करणार आहे. घरबसल्या वैद्यकीय सल्ला मिळेल. अनेक वैद्यकीय उपकरणांद्वारे व्यक्तीच्या शारीरिक परिस्थितीची माहिती अचूकपणे विश्लेषण करून एआय उपायही सुचवेल. शाळांमध्ये प्रत्येक मुलाच्या कुवती व आवडीनुसार त्याच्यासाठी पाठ्यक्रम बनवून अभ्यास घेता येईल. वृद्ध व्यक्तींना साथ मिळेल - वेळेवर औषधं घेण्यासाठी आठवण करणे, बँकेच्या कामामध्ये मदत करणे किंवा इतर जीवनावश्यक व महत्त्वपूर्ण माहिती पुरविणे. हे सगळं एआयमुळे शक्य होणार आहे, पण हे सगळं त्यांच्यासाठी असेल जे आजपासून त्याचा वापर शिकतील. एकच गोष्टं लक्षात ठेवा-एआय माणूस नाही, पण माणसाला अधिक माणूस बनवू शकतो. एआय ही एक “मदतनीस” आहे -“मालक” नव्हे. तो तुमच्या कल्पकतेला हातभार लावतो.
तुमच्या वेळेला किंमत देतो आणि तुमच्या जगण्याला थोडं अधिक सोपं बनवतो. तर मग उगाच घाबरून नका राहू - आजपासून एआयशी मैत्री करा. कारण हे भविष्य तुमच्याही हातात आहे.

Comments
Add Comment