Thursday, October 30, 2025
Happy Diwali

जीममधील अनधिकृत बांधकामावर होणार कारवाई

जीममधील अनधिकृत बांधकामावर होणार कारवाई

मुंबई (वार्ताहर): पवई येथील एका पार्किंगमध्ये सुरू असलेल्या 'गोल्ड जिम'वर एक महिन्यात कारवाई केली जाणार आहे. याबाबत येथील अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत संबंधितांना एक महिन्याच्या मुदतीची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या भांडुप एस विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पवई येथील हिरानंदानी वसाहतीतील सुप्रीम बिझनेस पार्क या इमारतीच्या पार्किंग क्षेत्रात सुरू असलेल्या गोल्ड जिमवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप असलेली तक्रार पालिकेकडे करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या इमारत व कारभार विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या संबंधित जिमला एक महिन्याचा नोटीस बजावून सर्व अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत तक्रार केल्यामुळे अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत इमारतीच्या स्टिल्ट लेव्हल ४ या पार्किंगच्या जागेत जिम सुरु असल्याचे आढळले.

या ठिकाणी अनधिकृतपणे विभाजन भिंती, हलक्या पत्र्यांचे पार्टिशन्स, काचांचे केबिन्स आदी उभारले असून, त्यासाठी महापालिकेच्या सक्षम प्राधिकरणाची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाही असे निरीक्षणात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट कले आहे. दरम्यान, पालिकेच्या नोटीसनुसार, एका महिन्याच्या आत हे सर्व अनधिकृत बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले असून, आदेशाचे पालन न झाल्यास महापालिकेकडून ही कारवाई करण्यात येईल व संबंधित खर्च मालकांकडून वसूल केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

या जिनबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यामुळे आम्ही त्या व्यवस्थापनाला नोटीस दिली आहे. एक महिन्याचा अवधी दिला असून, सध्या कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र नंतर सर्व वावी तपासून कारवाई केली जाईल.- अमोल थोरात, पालिका अधिकारी, एस विभाग, भांडुप

Comments
Add Comment