लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे इंग्लंडला भोवले आहे. भारताने धावांचा पाऊस पाडला आहे. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत भारताने सात बाद ४५४ धावा केल्या आहेत. भारताच्या तीन प्रमुख फलंदाजांनी शतकी खेळी केली आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वालने १०१ धावा केल्या. भारताचा कर्णधार शुभमन गिल १४७ धावा करुन बाद झाला. रिषभ पंतनेही शतक (१३४) केले आहे. केएल राहुल ४२ धावा करुन बाद झाला तर साई सुदर्शन आणि करुण नायर हे दोघे शून्य धावा करुन बाद झाले. शार्दुल ठाकूर एक धाव करुन परतला. रवींद्र जडेजा नुकताच मैदानात उतरला आहे. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने चार तर शोएब बशीर, ब्रायडन कार्से, जोश टंग या तिघांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
धावांचा पाऊस पाडल्यामुळे भारत सुस्थितीत आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. टीम इंडियाची झकास सुरुवात बघता इंग्लंडपुढे मोठे आव्हान आहे.
शुभमन गिलवर होणार दंडात्मक कारवाई
शुभमन गिल फलंदाजीसाठी आला त्यावेळी पांढऱ्या रंगाऐवजी चुकून काळ्या रंगाचे मोजे घालून मैदानात आला. कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार मैदानात पांढऱ्या रंगाचे मोजे वापरणे आवश्यक होते. यामुळे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गिलला सामन्याच्या मानधनाच्या दहा ते वीस टक्क्यांपर्यंतची रक्कम दंड म्हणून भरावी लागण्याची शक्यता आहे. गिलने चुकून अथवा पांढरे मोजे ओले असल्यामुळे काळ्या रंगाचे मोजे वापरले असतील तर त्याला दंडात्मक कारवाईतून सूट मिळू शकते. पण यासाठी गिलला त्याची बाजू मांडावी लागेल. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी ते मुद्दे स्वीकारले तरच गिलला कारवाईतून सूट मिळू शकते.