लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन बाद ३५९ धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल या दोघांनी शतके केल्यामुळे भारताची सुरुवात चांगली झाली आहे. पण कर्णधार गिलवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार शुभमन गिल १२७ धावांवर आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत ६५ धावांवर खेळत आहे. याआधी सलामीवीर यशस्वी जयस्वाल १०१ धावांची शानदार खेळी करुन परतला आहे. केएल राहुलने ४२ धावा केल्या तर साई सुदर्शन शून्य धावा करुन बाद झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शनला बाद केले तर ब्रायडन कार्सेने केएल राहुलला बाद केले. भारत सध्या सुस्थितीत आहे. पण कर्णधार गिलला कसोटी क्रिकेटच्या ड्रेस कोडचे (वेशभूषेसाठीचे नियम) उल्लंघन केल्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल फलंदाजीसाठी आला त्यावेळी पांढऱ्या रंगाऐवजी चुकून काळ्या रंगाचे मोजे घालून मैदानात आला. कसोटी क्रिकेटच्या नियमानुसार मैदानात पांढऱ्या रंगाचे मोजे वापरणे आवश्यक होते. यामुळे नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गिलला सामन्याच्या मानधनाच्या दहा ते वीस टक्क्यांपर्यंतची रक्कम दंड म्हणून भरावी लागण्याची शक्यता आहे. गिलने चुकून अथवा पांढरे मोजे ओले असल्यामुळे काळ्या रंगाचे मोजे वापरले असतील तर त्याला दंडात्मक कारवाईतून सूट मिळू शकते. पण यासाठी गिलला त्याची बाजू मांडावी लागेल. त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी ते मुद्दे स्वीकारले तरच गिलला कारवाईतून सूट मिळू शकते.