Saturday, October 25, 2025
Happy Diwali

"आज्जी बाई जोरात" आता शाळांमध्येही: मराठीची गोडी वाढवण्यासाठी अनोखा उपक्रम!

मुंबई: जिगीषा आणि अष्टविनायक निर्मित, क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित 'म मराठीचा' म्हणत मराठी रंगभूमीवर धमाल केलेल्या 'आज्जी बाई जोरात' या पहिल्या AI महाबालनाट्याने उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रेक्षकांची मनं जिंकली. बालकांसह पालकांनीही या नाटकाला भरभरून प्रतिसाद दिला. हसत-गात, नाचत-बागडत या नाटकाने सध्याच्या पिढीमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण केली. निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, मुग्धा गोडबोले, अभिजीत केळकर, जयवंत वाडकर यांसारख्या ११ कलाकारांच्या मांदियाळीने नटलेल्या या नाटकाला प्रेक्षकांकडून आणि मान्यवरांकडूनही खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनेकांनी, "आजच्या पिढीला मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढून त्यांच्या हातात पुस्तकं पुन्हा येऊ घालत आहेत ते या नाटकामुळे," अशी प्रतिक्रिया दिली.

या नाटकाच्या यशातून या वर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पुस्तकांचा खप वाढल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता, 'आज्जी'ने प्रत्येक शाळांमध्ये जाऊन मराठीची ही गोडी निर्माण करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी सक्तीची नसणे ही घटना अत्यंत खेदजनक आहे. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे तिला तिच्याच माहेरी बेदखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, हे दुर्दैवी आहे. आपण मराठी भाषिक म्हणून यावर निश्चितच पाऊल उचलायला हवे. पुढील पिढीला 'म मोबाईलचा' ऐवजी 'म मराठीचा' गिरवता यावा यासाठी आता 'आज्जी' शाळेत निघाली आहे!

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजता यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे साने गुरुजी इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांसाठी 'आज्जी बाई जोरात' या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

या प्रयोगासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. 'आज्जी' घराघरात तर पोहोचलीच आहे, आता ती नातवंडांसोबत शाळेतही निघाली आहे. आपणही मराठीच्या या प्रवासात सहभागी होऊन 'म मराठीचा' गिरवूया!

Comments
Add Comment