आपली सायबर सुरक्षा आपल्याच हाती...

  116

कोरोनासारखे संसर्गजन्य आजार जरी धोकादायक असले तरी औषधांनी आणि योग्य उपचारांनी बरेही होऊ शकतात. या उलट सायबर अटॅक असे असतात की, आपण जेवढे थांबवायला बघू तेवढे ते नवनवीन पद्धतीने आणि मार्गांनी वाढतच जातात. बरं त्यांचे लक्ष्य केवळ श्रीमंत उद्योजकच नसतात, तर कोणीही त्यांचे शिकार होतात, कारण आता गरीब असो की श्रीमंत, शहरातला असो की ग्रामीण, सर्वांकडेच इंटरनेट आणि स्मार्ट फोन असतात. अनेकांना टेक्नॉलॉजीचे ज्ञान नसते आणि याचाच फायदा सायबर हल्लेखोर लीलया घेतात.



वृषाली आठल्ये : मुंबई ग्राहक पंचायत


अलीकडेच काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या भारतीय नागरिकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला करून २६ निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार रॉकेट हल्ले करत अवघ्या २२ मिनिटांमध्ये ते सर्व तळ बेचिराख केले. हा हल्ला इतका जबरदस्त आणि अचूक होता की, पाकिस्तानला अक्षरशः भारतापुढे गुढघे टेकावे लागले. मात्र युद्धाची सुरुवात होताच पाकिस्तानी सायबर हल्लेखोरांनी भारताच्या प्रमुख वित्तीय संस्था, सरकारी वेबसाइटसवर हल्ले सुरू केले. भारत सरकारच्या एका अधिकृत माहितीनुसार या सायबर हल्लेखोरांनी भारताच्या विविध वेबसाइटरवर ७०० पेक्षा जास्त हल्ले केले. यात त्यांनी भारतातील सर्वसामान्यांना लक्ष्य केले होते. उदा. भारतीय सेनेचा पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला. बघा कसे भारताने अचूक हल्ले करून पाकिस्तानला केले नामोहरम.... हे बघा भारतीय युद्ध विमाने पाडल्याचे पुरावे... असा व्हीडियो लिंक आणि एपीके फाइल्स तयार करून हे हल्ले करण्यात आले. जो कोणी उत्सुकतेने या लिंकवर क्लिक करत असे त्याचे बँक खाते लगेचच हॅक करून त्यातील रक्कम परस्पर दुसऱ्या खात्यात वळवली जात असे. इकडे लिंकवर क्लिक केले की अवघ्या काही सेकंदात त्या व्यक्तीचे खाते हॅक करून आर्थिक लुबाडणूक केली जात होती. अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मुंबईतील वडाळा येथे राहणारा एक व्यापारी गुजरातमध्ये तीर्थयात्रेला गेला होता. यादरम्यान स्कॅमरने त्यांच्या डीमॅट खात्याशी जोडलेला मोबाइल संपर्क नंबर बदलला आणि त्या व्यापाऱ्याच्या ई मेल खात्याशी मिळता-जुळता बनावट ई मेल तयार केला व त्याच्या खात्यातील तब्बल २० लाख रुपयांचे शेअर्स परस्पर अन्य खात्यात वळवले.


अन्य एका घटनेमध्ये सायबर भामट्याने मुंबईतील एका नामवंत कंपनीच्या ई मेल खात्याशी साधर्म्य असणारे ई मेल खाते तयार केले व या कंपनीशी व्यवहार करणाऱ्या एका महिलेला तिच्या त्या बनावट ई मेलद्वारे संपर्क केला आणि तिला तिच्या बँक खात्यातील ११ लाख रुपये त्याच्या खात्यात जमा करण्यास राजी केले. ते ई मेल खाते कंपनीच्या ई मेल खात्याशी मिळत-जुळत असल्याने त्या महिलेने कोणतीही खातरजमा न करता पैसे सांगितले त्या खात्यात वळवले. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या महिलेने मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेत तक्रार केली. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलिसांनी त्या सायबर चोराला पकडले व त्या महिलेचे पैसे तिला परत केले. हे सायबर हल्लेखोर आपले सावज हेरण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या खुबीने वापर करतात. विशेष अपडेट, युद्धाशी संबंधित दृष्ये किंवा लिक झालेल्या फुटेजेसचा वापर करून मालवेअर, स्पायवेअर किंवा फिशिंग वेबलाइटसच्या लिंक देऊन सर्वसामान्यांना आकर्षित करतात. हे काम व्हॉटसअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातूनही केले जाते. त्यामुळे सायबर शाखा पोलिसांनी सर्वांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. व्हॉटसअॅप आणि टेलिग्राम वापरणाऱ्यांनी विश्वासू व्यक्तीने पाठवल्या असल्या तरी अज्ञात व्हीडियो, फोटो अथवा बातम्यांच्या लिंक उघडू नयेत. त्याचप्रमाणे असे संदेश पुढे पाठवूही नयेत. मेसेजिंग अॅपद्वारे पाठवण्यात आलेल्या APK फाइल्स आपल्या मोबाइल अथवा संगणकावर इन्स्टॉल करणे टाळावे, विवादित अपडेट किंवा संवेदनाशील फुटेज दाखवण्याचा दावा करणाऱ्या फॉरवर्ड केलेल्या लिंक उघडू नका, ज्ञात व्यक्तींनी पाठवलेले ई मेल उघडू नका, आवश्यक नसलेल्या ई मेलच्या लिंक डाउनलोड करणे टाळा, कोणताही ई मेल उघडताना पत्ता काळजीपूर्वक तपासा, कारण फिशिंग अथवा स्पॅम ई मेल बहुतांशवेळी कायदेशीर संस्थांची हुबेहूब नक्कल करतात. सोशल मीडियावर आलेल्या व्हीडियो लिंकची खात्री नसेल तर ती उघडण्याचा प्रयत्न करू नका.


बाह्य किंवा क्लाउड स्टोरेजचा नियमित बॅकअप घ्या. आपले पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका. आपली वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर प्रसारित करू नका. संगणक किंवा मोबइलमध्ये एंटीव्हायरस सॉफ्टवेअर नियमित अपडेट करा. खात्री नसेल असे संदेश सोशल मीडियावर फॉरर्वड करू नका. थोडक्यात काय तर आपली सुरक्षा ही पोलिसांची जबाबदारी असली तरी ती तितकीच आपलीही आहे. थोडेसे सावधान-सतर्क राहिले तर आपली लुबाडणूक टाळता येऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडिया वापरताना थोडी काळजी घेतली आणि वैयक्तिक गुप्तता पाळली तर ते आपल्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.


mgpshikshan@gmail.com

Comments
Add Comment

दुरावलेला मित्र पुन्हा जवळ!

भारतापासून अतिशय जवळ आणि हिंदी महासागरात व्युहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानी असलेल्या मालदीवशी भारताचे

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय