Monday, August 11, 2025

मुरबाडमध्ये मण्यार सापाचा वावर वाढला

मुरबाडमध्ये मण्यार सापाचा वावर वाढला

नागरिकांना आरोग्य विभागाची खबरदारी घेण्याचे आवाहन


मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील विशेषतः मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात पावसाळा सुरू झाला की, अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस निशाचर प्राण्यांचा वावर वाढतो. अशातच सर्वात विषारी मानला जाणारा सर्प म्हणजे मण्यार जातीचा आहे. पावसाळ्यामध्ये पाणी शिरून सर्प बसण्याची जागा पाण्याने भरल्याने सर्प हे मानवी वस्तीमध्ये म्हणजेच घरामध्ये अथवा ज्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळेल अशा ठिकाणी असे विषारी सर्प आपला निवारा शोधतात. अशाच प्रकारे मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी मण्यार सर्पदंशाने लोक दगावले आहेत. म्हणून खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.



मण्यार सर्प हा काही ठिकाणी कंडोर, कांडोरा, मण्यार असे बोलले जाते. मुरबाड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मण्यार जातीचा सर्प मोठ्या प्रमाणात आढळतो. या सर्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्पाचे डोके लहान असून तोंड चपटे असते व हा काळसर रंगाचा असून त्याच्या अंगावरती सफेद रंगाच्या पट्टे असतात. हा सर्प निशाचर मधला खरोखरच असल्याचा पुरावा म्हणजे हा रात्रीचा शिकारीवर निघत असतो. त्याचे शिकार म्हणजे छोटे बेडूक, उंदीर, किडे, पाली, सरडे असे असते यामुळे तो लोक वस्तीमध्ये लोकांच्या घरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. हा रात्रीच्या वेळेस त्याचे भक्ष शोधत असताना उष्णतेचे ठिकाण म्हणून अनेकांच्या अंथरुणात घुसून बसतो. माणसाची हालचाल झाल्यास त्याच्या नरम अथवा चपट्या भागाला तो दंश करतो. त्याचे कारण त्याचे तोंड चपटे व लहान असते त्यामुळे तो कानाची बाळी बोटांच्या फटीमध्ये पायांच्या बोटांच्या फटीमध्ये वा टाचेच्या वरच्या भागाला जास्त प्रमाणात चावण्याच्या खुणा आढळतात. हा मन्यार सर्प चावताना त्याचा दंश समजून येत नाही त्यामुळे त्याचे विष काही काळानंतर झोपेतच माणसाच्या शरीरात पसरते व मेंदूला मज्जातंतूला बाधित करते व श्वसन घेण्यास त्रास झाल्याने माणसाचे शरीर मृत करतो हा मण्यार सर्प नाग-कोब्रा अशा जातींच्या सर्पांपेक्षा याच्या विषयाचे प्रमाण अधिक व जहाल असते. मण्यार सर्प लहान असो वा मोठा याचे विषाचे प्रमाण १००% घातक असते.


मण्यार सर्पाचे दात अतिशय बारीक व तीष्ण असल्याने तो दंश करताना समजून येत नाही व दंश झालेली जागा देखील लवकर समजून येत नाही व मनुष्य झोपेत असताना अशा प्रकारे मण्यार सर्प हा जास्त प्रमाणात दंश करतो. मण्यार सर्पाच्या राहण्याची जागा ह्या अडगळीच्या ठिकाणी दरवाजाच्या फटीत, खिडकीच्या फटीत, विटांच्या फटीमध्ये व बारीकशा बारीक जागेमध्ये मण्यार सर्प राहू शकतो व तो दिवसा जास्त दिसून येत नसून निशाचर असल्याने हा रात्रीच बाहेर पडतो. मण्यार सर्प फक्त घरातील एका मनुष्याला चावून थांबत नाही, तर आजूबाजूच्या देखील मनुष्यांना चाऊ शकतो. एवढा हा घातक व विषारी रागीट सर्प आहे. त्यामुळे याच्यापासून लांब राहणे व सावधान राहणे हेच योग्य आहे. जर आपल्याला कोणाला चावला असे समजले असेल तर ताबडतोब आरोग्य विभागाशी व दवाखान्यात जाऊन संपर्क साधावा. त्याचा इलाज हा दवाखान्यातच होईल तसेच जर समजून आल्यास दंश झालेल्या जागेच्या वरच्या बाजूस कापडी दोरीने घट्ट आवळून बांधावे तसेच कोणताही सर्प चावल्यास आपण जवळच्या दवाखान्यात दाखल व्हावे असे टोकावडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधीक्षक वैद्यकीय अधिकारी नितीन मोकाशी यांनी केले आहे.



मी आतापर्यंत मुरबाड तालुक्यासह इतर ठिकाणी अनेक विषारी, बिनविषारी सर्प पकडून त्यांना वन विभागाच्या जंगलामध्ये सोडलेले आहे. मण्यार सर्प हा खरोखरच सर्वात जास्त विषारी व चप्पळ तसेच घातक आहे. याचा चावा सहज समजून येत नाही. याच्यापासून हवा तेवढा आपला बचाव करणे हेच योग्य आहे.
- अनिल सकट, सर्पमित्र
Comments
Add Comment