ठाणे : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आला आणि अंगदुखीचा त्रास वाढला. यामुळे त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजारी असल्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यावर बुधवारपासूनच उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी प्रताप सरनाईक यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तब्येत बिघडल्यामुळे बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तापामुळे प्रताप सरनाईक यांना अशक्तपणा जाणवत आहे. पण त्यांच्या कोरोना, डेंग्यू आणि टायफॉइडच्या आतापर्यंत केलेल्या चाचण्या नकारात्मक आल्या. सरनाईक यांना कोरोना, डेंग्यू, टायफॉइड झालेला नाही, असे चाचणीचे अहवाल बघून डॉक्टरांकडून सांगण्यात आले. उपचार सुरू आहेत आणि प्रताप सरनाईक विश्रांती घेत आहेत. लवकरच त्यांच्या तब्येतीला आराम पडेल, असे डॉक्टरांनी सांगितले.