
जळगावमध्ये एका व्यक्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
जळगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगवाच्या आकाशवाणी चौक परिसरात ही घटना घडली. मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच ही व्यक्ती समोर आली आणि त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीची रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला . पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव दौऱ्यावर असून. त्यांचा ताफा जळगाव शहरामध्ये दाखल होताच या ताफ्यामध्ये घुसून एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
'या' कारणामुळे केला आत्मदहनाचा प्रयत्न
शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्याने संजय वराडे या ठेकेदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली. सदर घटनेनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या जळगाव दौऱ्यामुळे शहरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.