Monday, September 15, 2025

नांदेडमध्ये हृदयद्रावक घटना: विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नांदेडमध्ये हृदयद्रावक घटना: विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. वन्नाळी येथील २१ वर्षीय मंगेश बालाजीराव पाटील याचा विहिरीत पोहत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण वन्नाळी गावात शोककळा पसरली आहे.

बुधवारी दुपारी मंगेश आपल्या मित्रांसोबत वन्नाळी आणि चैनपूर शिवारातील भुजंग दशरथराव पाटील यांच्या मालकीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. विहिरीत उतरल्यानंतर काही वेळाने मंगेशच्या मित्रांना विजेचा धक्का जाणवला आणि त्यांनी तातडीने विहिरीतून बाहेर उडी मारली. मात्र, मंगेश पोहतच राहिला आणि त्याचवेळी त्याला जोरदार विजेचा धक्का लागला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मित्रांनी तात्काळ गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. गावकऱ्यांनी धाव घेत मंगेशला विहिरीतून बाहेर काढले, पण तोपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. मंगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरा वन्नाळी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगेश नायगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर आणि नातेवाईकांवर मोठा आघात झाला आहे. पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम हिंगोले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत अशा दुर्घटना टाळण्यासाठी विहिरी किंवा इतर जलाशयांमध्ये पोहताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment