Thursday, July 10, 2025

बदलापूरकरांचा प्रवास होणार सुसाट; चिखलोली स्थानकाशी जोडणी

बदलापूरकरांचा प्रवास होणार सुसाट; चिखलोली स्थानकाशी जोडणी

ठाणे-भिवंडी, कल्याण मेट्रो अंबरनाथला जोडणार


लोकल ट्रेनवरील ताण कमी होईल


मुंबई  : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार आहे. ही मेट्रो अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली स्थानकाशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) घेण्यात आला आहे. त्यामुळे चिखलोली रेल्वे स्थानकाशी मेट्रो प्रकल्पाची जोडणी होऊन हे स्थानक भविष्यातील एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येणार आहे. तसेच कल्याण-बदलापूर-कांजूरमार्ग मेट्रो-१४ प्रकल्पामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि आसपासच्या रहिवाशांना ठाणे आणि मुंबई गाठणे सोपे होणार आहे. एमएमआरडीएकडून यासंदर्भात विकास आराखड्याच्या निर्मितीची तयारी सुरू करण्यात आली आहे.


चिखलोली रेल्वे स्थानक येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रिकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या आहेत. सध्या या दोन्ही मेट्रो प्रकल्पांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा मेट्रो प्रकल्प कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि चिखलोली या भागांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार असून, 'एक शहर एक मेट्रो नेटवर्क' या संकल्पनेची सुरुवात यामुळे प्रत्यक्षात होणार आहे. शिवाय, चिखलोली स्थानकातून रेल्वे आणि मेट्रो अशी द्विस्तरीय वाहतूक सुरू झाल्यास या भागातील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असा दावा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

Comments
Add Comment