रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर भूस्खलन झाले. भूस्खलन होऊन डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि मोठे दगड कोसळले. जंगलचट्टी घाटाजवळील डोंगराच्या माथ्यावरून दगड - मातीचा ढिगारा खाली आला. या ढिगाऱ्याखाली दबून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. अपघाताच्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. याआधीही दोन दिवसांपूर्वी पावसामुळे केदारनाथ मार्गावर अपघात झाला होता.
केदारनाथ मार्गावर १८ जून रोजी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी जंगलचट्टी गधेरेजवळ डोंगरावरुन मातीचा ढिगारा आणि दगड कोसळले. या अपघातात पाच लोक ढिगाऱ्याखाली आले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ जंगलचट्टी येथील पोलिसांनी आणि डीडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. मदतकार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता आणि इतर तीन जण जखमी होते.
केदारनाथ भागात मोठा पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे मार्गावर अनेक ठिकाणी अपघात होण्याचा धोका वाढला आहे.