नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अॅक्सिओम-४ मिशन २२ जून रोजी रवाना होणार आहे. याआधी वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे मागील काही दिवसांत ही मोहीम वारंवार पुढे ढकलली जात होती. आधी प्रतिकूल हवामानामुळे, नंतर यानातील वायू गळती सुरू झाल्याचे लक्षात आल्यामुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.
मोहीम सुरळीत आणि सुरक्षितरित्या व्हावी यासाठी खबरदारी घेतली जात आहे. किरकोळ चूक नंतर जीवघेणी ठरू शकते. यामुळेच तांत्रिक दोष लक्षात येताच ते दूर करण्यासाठी मोहीम काही काळ पुढे ढकलली होती. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि अॅक्सिओम-४ मिशन २२ जून रोजी रवाना होईल, असे या मोहिमेशी संबंधित असलेल्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.
अॅक्सिओम-४ मिशनमध्ये भारताचे शुभांशू शुक्ला तसेच पोलंड, हंगेरी आणि अमेरिकेचे अंतराळवीर आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे १९८४ नंतर अंतराळात जाणारे भारताचे दुसरे राष्ट्रीय अंतराळवीर आहेत. याआधी १९८४ च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या यानातून भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा अंतराळात गेले होते. यामुळे भारतीयांचे लक्ष अॅक्सिओम-४ मिशनकडे आहे.