Wednesday, August 13, 2025

महिलांच्या नावे बनावट आयडी बनवणारा शुभम सिंग, पोलिसांच्या जाळ्यात; २५ वर्षीय सुरक्षा रक्षकाकडून ३०० महिलांची फसवणूक

महिलांच्या नावे बनावट आयडी बनवणारा शुभम सिंग, पोलिसांच्या जाळ्यात; २५ वर्षीय सुरक्षा रक्षकाकडून ३०० महिलांची फसवणूक

मुंबई : महिला आणि मुलींच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून अश्लील मेसेज पसरवणाऱ्या शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग (वय २५) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा सुरक्षा रक्षक ३०० हून अधिक महिलांना ब्लॅकमेल करत त्यांची बदनामी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


एका महाविद्यालयीन तरुणीच्या नावाने अनेक अश्लील इन्स्टाग्राम अकाउंट्स तयार करून, त्यावर तिच्याबद्दल अश्लील संदेश आणि स्टोरीज पोस्ट केल्या जात होत्या. ही बाब तरुणीच्या निदर्शनास येताच, तिने तात्काळ दहिसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.



दहिसर पोलिस ठाण्याच्या सायबर सेलचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश दांडगे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी इन्स्टाग्राम आयडीबाबत गुगल आणि फेसबुककडून माहिती मिळवली. तांत्रिक माहितीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी शुभम कुमार मनोजप्रसाद सिंग याला कर्नाटकातून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



आरोपीच्या मोबाईलमध्ये धक्कादायक माहिती उघड


चौकशीदरम्यान, सिंगने दिल्लीतील रेहान कॉम्प्युटर आय. टी. सेंटरमधून सॉफ्ट स्किल कॉम्प्युटर ट्रेनिंग प्रोग्रॅमचा डिप्लोमा पूर्ण केल्याचे समोर आले. त्याच्या मोबाईलमध्ये केलेल्या तपासणीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.


विविध महिला आणि मुलींच्या नावाचे त्याने १०० बनावट ईमेल आयडी तयार केले होते.


वेगवेगळ्या महिलांच्या नावाचे ११ बनावट इन्स्टाग्राम आयडी तयार करून ते वापरात असल्याचेही निष्पन्न झाले.


त्याच्या गॅलरीमध्ये इतर वेगवेगळ्या महिला आणि मुलींचे सुमारे १३,५०० फोटो स्क्रीनशॉट काढून जतन केलेले आढळले.


वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हा मुली आणि महिलांना इन्स्टाग्रामवर फॉलो करून, मेसेज पाठवून त्यांना ब्लॅकमेल करत असे आणि न्युड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत असे. जर त्यांनी नकार दिला, तर तो त्यांचे फोटो आणि नाव वापरून बनावट प्रोफाइल तयार करत असे आणि अश्लील मेसेज फोटोंसह इन्स्टाग्रामवर प्रसारित करत असे.


पोलिसांनी सिंगविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६६ (C) आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या अटकेमुळे सायबर गुन्हेगारीला आणि सोशल मीडियावरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >