कॅलगरी शहराला कॅनडाची ऊर्जेची राजधानी असे म्हणतात. कारण कॅलगरी कॅनडातील ऊर्जा आणि पेट्रोलियम उद्योगाचे केंद्र आहे. टर्नर व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचे साठे सापडल्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच शहराचे महत्त्व वाढत गेले. शहराच्या मध्यभागी चमकदार गगनचुंबी इमारती आणि शहराच्या सीमावर्ती भागात असलेले पर्वत यामुळे हे शहर अनेकांना प्रिय आहे.
कॅलगरी शहराच्या लोकसंख्येमध्ये सुमारे ११ टक्के दक्षिण आशियाई नागरिक आहेत. यातही भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. भारतीयांव्यतिरिक्त या भागात पाकिस्तानी नागरिकही मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. व्यवसाय, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात भारतीय वंशाचे लोक महत्त्वाची भूमिका बजावतात.कॅलगरीत दरवर्षी जुलै महिन्यात दहा दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करतात. याआधी १९८८ मध्ये कॅलगरीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक झाले होते. कॅनडाचे दुसरे सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय, ग्लेनबो संग्रहालय आणि सुंदर नैसर्गिक स्थळे कॅलगरीत आहेत.
कॅलगरीत झालेल्या २०२१ च्या जनगणनेनुसार, सुमारे १५ लाख नागरिक शहरात वास्तव्यास आहेत. हे कॅनडातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे आणि वेगाने वाढणाऱ्या महानगरीय प्रादेशिक लोकसंख्येसह आर्थिक आणि शहरी विकासाचे एक प्रमुख केंद्र आहे. कॅलगरीमध्ये राहण्याचा खर्च कॅनडातील टोरंटो किंवा व्हँकुव्हरसारख्या इतर मोठ्या शहरांपेक्षा कमी आहे. घर, वाहतूक आणि दैनंदिन खर्चासाठी सरासरी उत्पन्न प्रति तास २२ कॅनेडिअन डॉलर एवढे आहे.